आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक उत्पादनाची वाढ मंदच; प्रमुख क्षेत्रांची खराब कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औद्योगिक उत्पादनाच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. काही प्रमुख क्षेत्रांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे यंदाच्या एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनात आणखी दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने देशातील विविध प्रकल्पांना आता लवकरात लवकर मंजुरी देण्याबरोबरच रिझर्व्ह बँकेकडूनदेखील व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादन, खाणकाम, ऊर्जा आणि भांडवली वस्तू यांसारख्या काही प्रमुख क्षेत्रांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादनाची गाडी रुळावरून घसरली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मार्च महिन्यातील 3.4 टक्क्यांवरून घसरून 2 टक्क्यांवर आला आहे.


खाणकाम आणि उत्पादन क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे ही घसरण झालेली असली तरी अगोदरच्या आर्थिक वर्षातल्या याच कालावधीतील 1.3 टक्के घसरणीच्या तुलनेत यंदा त्यात थोडीफार सुधारणा झाली आहे.
औद्योगिक उत्पादनात एप्रिल महिन्यात झालेली घट निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया नियोजन आयोगाचे अध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक वाढ कमी झालेली असली तरी अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील घसरणीच्या तुलनेत त्यात थोडीफार सुधारणा झालेली असली तरी फार भक्कम नाही, असेही ते म्हणाले.


रिझर्व्ह बॅँकेची या परिस्थितीवर बारकाईने नजर असून मध्यवर्ती बँक याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असा आशावाद अहलुवालिया यांनी व्यक्त केला आहे.


हवे दर कपातीचे औषध
एप्रिल महिन्यात औद्योगिक उत्पादनाने नोंदवलेल्या घसरणीबद्दल उद्योग जगताने नाराजी व्यक्त करत रिझर्व्ह बँकेने व्याज कमी करण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. रखडलेल्या प्रकल्पांना गती व गुंतवणुकीला चालना देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.


हस्तक्षेपाची गरज
रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून व्याजदर कमी करण्याची गरज आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये सर्वाधिक घट नोंदवली गेली आहे. उत्पादन आणि पायाभूत क्षेत्रातील एकूणच गुंतवणुकीचे वातावरण थंड झाले आहे, परंतु मंत्रालयांकडून मंजुरी न मिळाल्यामुळे रखडलेल्या पायाभूत प्रकल्पांची जोपर्यंत अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत औद्योगिक उत्पादनाचा आलेख घसरताच राहण्याची भीती आहे.
नैना लाल किडवाई, अध्यक्ष फिक्की.


व्याजदर घटवावेत
औद्योगिक वाढीतील घट निराशाजनक असून रिझर्व्ह बँकेने 17 जून रोजी जाहीर होणारे नाणेनिधी धोरण सर्वसमावेशक राबवण्याची गरज आहे. चढ्या व्याजदराने मागणी घटली आहे. पायाभूत क्षेत्रातल्या पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याबरोबरच गुंतवणुकीवरील मंत्रिमंडळ समितीने प्रकल्पांना झटपट मंजुरी देऊन गुंतवणुकीचे चक्र गतिमान करण्याची गरज आहे.
चंद्रजित बॅनर्जी, अध्यक्ष, सीआयआय.


धाडसी उपाय हवेत
गुंतवणुकीचे वातावरण सकारात्मक करण्याच्या दृष्टीने सरकारने काही धाडसी उपाययोजना केल्यास सध्याचे मंदीचे चित्र बदलण्यास मदत होऊ शकेल. याकरिता सरकारने गुंतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने सरकारने पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.
राजकुमार धूत, अध्यक्ष, असोचेम.


प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीचा आलेख
क्षेत्र वाढ (एप्रिल 2012) वाढ (एप्रिल 2013)
उत्पादन 1.8 % 2.8 %
ऊर्जानिर्मिती 4.6 % 0.7 %
खाणकाम - 2.8 % - 3.00 %
भांडवली वस्तू - 21.1 % + 1.00 %