आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Determine Investment Direction, Nomura Report Finding

महागाई ठरवणार गुंतवणुकीची चाल,नोमुराचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदाच्या वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा सक्रिय होऊन खरेदीचा सपाटा लावल्यामुळे दिलासा मिळाला आहे. महागाई घटल्यानंतर त्यांच्या खरेदीचा हा वेग वाढला आहे. परंतु महागाईतील घसरण अशीच कायम न राहिल्यास हे गुंतवणूकदार बाजाराकडे पाठ फिरवू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एक ते सतरा जानेवारी या कालावधीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी कर्ज बाजारात 2.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. परंतु आम्हाला अपेक्षित असलेल्या प्रमाणात जर महागाईमध्ये सुधारणा झाली नाही आणि पुन्हा चढ्या व्याजदराकडे वाटचाल सुरू झाली तर भांडवल बाजारात येत असलेला निधी पुन्हा उलट पावली जाऊ शकतो असे मत ‘नोमुरा’ने आपल्या एका अहवालात व्यक्त केले आहे.
घाऊक किमतीवर आधारात महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यातील 7.52 टक्क्यांवरून घसरून डिसेंबरमध्ये 6.1 टक्क्यांवर आला. दुस-या बाजूला किरकोळ महागाईदेखील 11.6 टक्क्यांवरून कमी होऊन 9.9 टक्क्यांवर आली आहे.
मे महिन्याच्या शेवटी अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने आपला 85 अब्ज डॉलरचा मासिक रोखे खरेदी कार्यक्रम कमी करण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी जवळपास सहा महिने बाजारातून हळूहळू गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली.
परंतु डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हने हा रोखे खरेदी कार्यक्रम 10 अब्ज डॉलरने कमी करणार असून त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबरमध्ये हे गुंतवणूकदार पुन्हा बाजारात सक्रिय झाले.
नोमुराने नोंदवलेली निरीक्षणे
० चलन बाजारात स्थिरावलेला रुपया आणि महागाई कमी झाल्यामुळे व्याजदर जैसे थे राहण्याची शक्यता यामुळेदेखील बाजारात निधी येत असल्याची शक्यता नोमुराने व्यक्त केली आहे.
० कर्ज बाजारात विदेशी निधीचा ओघ वाढला तर नजीकच्या काळात चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी ती फायदेशीर ठरेल याकडेही नोमुराने लक्ष वेधले आहे.
० एक ते 17 जानेवारी या कालावधीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांची कर्ज बाजारात 2.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक.
० महागाई वाढून व्याजदर चढे राहिल्याने विदेशी गुंतवणुकीची पावले उलट पडणार