आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ महागाईत घाऊक घसरण, ६.४६ टक्क्यांवरून ऑक्टोबरमध्ये ५.५२ टक्के

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजीपाला व अन्नपदार्थांच्या किमती उतरल्याने ऑक्टोबरमधील किरकोळ महागाई दराने घाऊक घसरण नोंदवली. सरकारकडून बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये ५.५२ टक्क्यांवर आला आहे. सप्टेंबरमध्ये हा दर ६.४६ टक्के होता.
विशेष म्हणजे, किरकोळ महागाईत सलग चौथ्या महिन्यात घसरण झाली आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये भाजीपाल्याच्या किमती १.४५ टक्क्यांनी कमी झाल्या. सप्टेंबरमध्ये भाजीपाला ८.५९ टक्क्यांनी महागला होता. फळांच्या किमतीही सप्टेंबरमधील २२.४ वरून ऑक्टोबरमध्ये १७.४९ टक्क्यांपर्यंत घसरल्या. प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती मात्र किंचित घसरण झाली.

स्वस्त कर्जाचे दार उघडणार :
किरकोळ महागाईने ऑक्टोबरमध्ये मोठी घसरण दाखवत मार्च २०१२ नंतर प्रथमच नीचांकी पातळी नोंदवली. यामुळे रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदर कपातीचा विचार करू शकते. येत्या दोन डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक नाणेनिधी धोरणाचा आढावा घेणार आहे. त्यात व्याजदरात कपात झाली, तर स्वस्त कर्जाचा मार्ग मोकळा होणार आहे.
औद्योगिक उत्पादन वाढीचा उच्चांक, औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये २.७ % वाढ

नवी दिल्ली - खाण, भांडवली वस्तू आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनवाढीने तीन महिन्यांचा उच्चांक गाठला. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) नावाने ओळखण्यात येणारा हा निर्देशांक सप्टेंबरमध्ये २.७ टक्क्यांनी वाढला आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी औद्योगिक उत्पादनांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार ऑगस्टमध्ये ०.४८ टक्क्यांची नोंद केलेल्या आयआयपीने सप्टेंबरमध्ये उत्तम कामगिरीची नोंद करत तीन महिन्यांचा उच्चांक गाठला. एप्रिल ते सप्टेंबर या काळात आयआयपीने २.८ टक्के वाढ नोंदवली आहे. आयआयपीमध्ये ७५ टक्के वाटा असणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने सप्टेंबरमध्ये २.५ टक्के वाढ दर्शवली. खाण क्षेत्राने ०.७ टक्के वाढ नोंदवली.
फायदा काय?
मागणी व पुरवठ्याचे गणित सुटणार
उद्योग क्षेत्रातील मरगळ दूर होणार
नव्या रोजगारांच्या संधींची शक्यता
महागाई कमी होण्यास मदत

पेट्रोल-डिझेल एक रुपयाने स्वस्त होणार
नवी दिल्ली - जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरत असल्याने देशातील पेट्रोल व डिझेलच्या किमती लिटरमागे एक रुपयाने स्वस्त होण्याची शक्यता आहे. असे झाले तर पेट्रोलच्या किमतीत होणारी ऑगस्टपासूनची सातवी, तर डिझेलच्या किमतीतील तिसरी कपात राहील. सरकारी तेल वितरण कंपन्या येत्या शनिवारी पेट्रोल व डिझेलच्या किमतींचा पाक्षिक आढावा घेणार आहेत. त्यानंतरही ही संभाव्य कपात जाहीर होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने घसरत आहेत. आगामी काळात हाच कल कायम राहिला, तर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कपात निश्चित आहे. ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे ९.३६ रुपयांची कपात करण्यात आली आहे.