आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा रावण मानगुटीवर, महागाईचा दर 6.46 टक्क्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कांदा आणि भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तू अद्यापही सामान्यांच्या बजेट पलीकडेच राहिल्याने महागाईचे दहन काही होत नाही. सप्टेंबरमध्ये ठोक महागाईने 6.46 टक्क्यांचा गेल्या सात महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे औद्योगिक वाढीला चालना देण्यासाठी 29 सप्टेंबरला व्याजदर कमी होण्याची आशा पुन्हा एकदा धूसर झाली आहे.


घाऊक किमतीवर आधारित महागाईने सलग चार महिने चढती कमान कायम ठेवली असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. जुलैमध्ये 5.85 टक्के आणि ऑगस्टमध्ये 6.1 टक्क्यांपर्यंत महागाई गेली होती. अगोदरच्या वर्षात सप्टेंबरमध्ये महागाई 8.07 टक्के नोंद झाली होती.


सगळ्यात जास्त महागाईचा कहर करण्यात कांद्याने आघाडी घेतली आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याच्या महागाईत लक्षणीय 322.94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कांद्याच्या पाठोपाठ भाजीपाल्याचे दर 89.37 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांना भाजीपाला कसा आणि कोणता खरेदी करावा याचा पेच पडला आहे. कांदा आणि भाजीपालाच नाही, तर फळेदेखील सप्टेंबरमध्ये 13.54 टक्क्यांनी महाग झाली आहेत.


स्थिती सुधारणार : विशेष म्हणजे अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत अन्नधान्याच्या महागाईचा दर 18.18 टक्क्यांवरून आता 18.40 टक्क्यांवर गेला आहे. जर महाईचा दर सहा टक्क्यांच्या वर असेल तर तो स्वीकारार्ह पातळीच्या वर असतो; पण येत्या काही महिन्यांत महागाईची ही स्थिती सुधारेल, असा विश्वास नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केला.


सरकारचे प्रयत्न सुरू
अन्नधान्यमंत्री के. व्ही. थॉमस म्हणाले की, किमान हमी भावात झालेली वाढ आणि नरेगा यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. येत्या 29 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँक दुस-या तिमाहीतील नाणेनिधी धोरण आढावा जाहीर करणार आहे; परंतु पुन्हा महागाईचा चढा कलच व्याजदराचे धोरण निश्चित करणार आहे. एकीकडे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कमी करण्याचा घोषा कंपन्यांनी लावला आहे; पण या वेळेलाही त्यांचे आर्जव ऐकले जाण्याची शक्यता कमीच आहे.


महागाईचे प्रमाण अद्याप चढेच असल्याने मान्य आहे; परंतु ही परिस्थिती महिन्याभात सुधारेल. किमती वाजवी पातळीवर आणण्यासाठी अन्नधान्याचा साठा बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचेदेखील ते म्हणाले.


दरी कमी करावी
बार्कलेजने आपल्या अहवालात ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या किमती स्थिरावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुरवठा आणि मागणी यातील दरी भरून काढून अन्नधान्याची महागाई कमी करण्याची गरज फिक्कीचे महासचिव दिदार सिंग यांनी
व्यक्त केली.


किरकोळ महागार्ईचा दर 9.84 %


भाजीपाल्याच्या तेजीने महागाईचा भडका
नवी दिल्ली । अन्नधान्याच्या किमती तसेच भाजीपाला कडाडल्याने सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 9.84 टक्क्यांवर पोहोचली. ग्राहक किंमत निर्देशांक म्हणून ओळखण्यात येणारा हा निर्देशांक ऑगस्टमध्ये 9.52 टक्के होता. सप्टेंबरमध्ये भाजीपाल्याच्या किमती 34.93 टक्के झाल्या. ऑगस्टमध्ये या किमती 26.48 टक्के होत्या. फळांच्या किमतीही 5.19 वरून 9.33 टक्क्यांवर पोहोचल्या.