आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा: अन्नधान्याच्या किमती स्थिरावल्या, फेब्रुवारीत महागाई दर 4.8 टक्क्यांवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कांदे, बटाट्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे गेल्या नऊ महिन्यांत पहिल्यांदाच महागाई पाच टक्क्यांच्या समाधानकारक पातळीच्या खाली गेल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी एक एप्रिलला जाहीर होणार्‍या नाणेनिधी धोरण आढाव्यात व्याजदर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला आता संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

घाऊक किमतीवर आधारित महागाई अगोदरच्या वर्षातल्या 7.28 टक्क्यांवरून कमी होऊन ती फेब्रुवारी महिन्यात 4.8 टक्क्यांवर आली आहे. जानेवारी महिन्यात हीच महागाई 5.05 टक्क्यांवर गेली होती.

लोकसभा निवडणुकांच्या अगोदरच किमतींमध्ये सुधारणा झाल्याबद्दल वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी समाधान व्यक्त करताना एकूण महागाई कमी झाली, ही आनंदाची गोष्ट असली, तरी महागाईच्या या पातळीकडे अजूनही काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे, असे म्हटले.

नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया म्हणाले की, महागाई कमी होणे ही चांगली बातमी आहे. किमती स्थिर पातळीवर आल्याने सुसह्य स्थिती असून आणखी सुसह्य स्थितीत येईल, असा आशावाद व्यक्त केला. कारण अन्नधान्याची महागाई हीच केंद्र सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.

जानेवारी महिन्यातील 8.12 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात फळे, तांदूळ आणि दूध वगळता अन्य बहुतांश जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे ही महागाई 8.8 टक्क्यांवर आली. आता कर्ज स्वस्त होते का या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वस्ताई आली कोठून
डिसेंबरपासून घसरणीचा प्रवास सुरू करत जानेवारी महिन्यात महागाई 5.05 टक्क्यांवर आली. फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर मे 2013 मध्ये महागाईने 4.58 टक्के इतकी कमी नोंद केली होती, परंतु जूनमध्ये त्यात काहीशी वाढ होऊन ती 5.16 टक्क्यांवर गेली. जानेवारी आणि फेब्रुवारीत कांदा, बटाटा, टोमॅटो, शेंगदाणे, डाळी व खाद्यतेले यांच्या किमती घसरल्याने स्वस्तार्ई आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

चिंता किरकोळ महागाईची
>घाऊक किंमत निर्देशांकात झालेली घसरण उत्साहवर्धक आणि सकारात्मक चिन्ह आहे. येणार्‍या काळात किमती स्थिर राहण्याचे निदर्शक आहे. सध्याच्या घडीला औद्योगिक वाढ मंदावलेली असल्याने रिझर्व्ह बँकेने येणार्‍या काळात रेपो दर कमी करण्याची गरज आहे.
-शरद जयपुरिया, अध्यक्ष, पीएचडीसीसीआय.

|> महागाईतील घसरणीचा कल दीर्घकाळात गुंतवणुकीचे वातावरण सुधारण्यास पोषक ठरेल. - फीच

>किरकोळ महागाई अद्यापही चढ्या पातळीवर आहे; परंतु महागाई आणखी कमी झाली, तर व्याजदर कपातीसाठी नाणेनिधी धोरणामध्ये वाव मिळू शकेल.
- सी. रंगराजन, अध्यक्ष, पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद.