आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा 25 महिन्यांचा नीचांक; महागाई दर 8.1 % वर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कांदा आणि बटाट्याच्या किमती उतरल्याने किरकोळ महागाईचा गगनावर गेलेला वेलू फेब्रुवारीत घसरून 25 महिन्यांच्या नीचांकावर आला. महागाई घसरल्याने रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करण्यास आता चांगला वाव असून त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा होईल.

सरकारने बुधवारी किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. ग्राहक किंमत निर्देशांक या नावाने ओळखण्यात येणारा हा निर्देशांक जानेवारीत 8.79 टक्के होता.

जानेवारीत भाजीपाला 21.91 टक्क्यांनी महागला होता, फेब्रुवारीत हा दर 14.04 टक्क्यांवर आला. अंडी, मांस, मासळी या सारख्या प्रथिनयुक्त पदार्थांची महागाई जानेवारीतील 11.69 टक्क्यांवरून 9.69 टक्क्यांवर आली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ फेब्रुवारीत 10.37 टक्क्यांनी महागले. फळे आणि मसाल्याचे पदार्थही फेब्रुवारीत महागले.

कर्ज स्वस्त होणार
व्याज दरवाढीने त्रस्त झालेल्या उद्योग क्षेत्राची नजर आता रिझर्व्ह बँकेकडे लागली आहे. व्याजदरात कपात करण्यात महागाईचा मोठा अडथळा असल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली नव्हती. आता रिझर्व्ह बँक एक एप्रिल रोजी पतधोरण आढावा घेणार आहे. त्या वेळी व्याजदरात कपातीची शक्यता वर्तवली जात आहे. किरकोळ महागाई 25 महिन्यांच्या नीचांकावर आल्याने गृह, वाहन व इतर कर्ज स्वस्ताईचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.