आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा वेलू पुन्हा शून्याखाली, भाजीपाला आणि कांद्याच्या किमतीत घसरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजीपाला आणि कांद्याच्या किमती उतरल्याने अन्नधान्य महागाई निर्देशांक 7 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात नकारात्मक पातळी कायम ठेवत (-) 0.42 टक्क्यांवर आला आहे. गेल्या तीन आठवड्यांत हा निर्देशांक सातत्याने ऋणात्मक पातळीत आहे. वाढते व्याजदर आणि महागडे कर्ज यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना अन्नधान्य महागाईत अधिक वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. निर्देशांकाबाबतची आकडेवारी गुरुवारी सरकारने जाहीर केली. त्याआधीच्या आठवड्यात हा निर्देशांक (-) 2.90 टक्के होता, तर गेल्या वर्षी जानेवारीच्या संबंधित आठवड्यात हा निर्देशांक 16 टक्के होता.
गेली दोन वर्षे सर्वांची डोकेदुखी बनलेली अन्नधान्य महागाई नोव्हेंबर 2011 च्या पहिल्या आठवड्यात दुहेरी अंकांत होती. ती घसरल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. आगामी नाणेनिधी धोरणात रिझर्व्ह बँक आता व्याजदरात कपात करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वार्षिक तुलनेत कांद्याच्या किमती 75.42 टक्के, तर गव्हाच्या किमती 3.57 टक्क्यांनी आणि बटाट्याच्या किमती 23.84 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. भाजीपाल्याच्या किमतीत 45.81 टक्के घट झाली आहे. मात्र, प्रथिनयुक्त पदार्थांसह इतर सर्व अन्नपदार्थांच्या किमतीही चढ्याच राहिल्या आहेत. फळांच्या किमती 10.03 टक्क्यांनी वधारल्या. दूध 11.48 टक्के महाग झाले आहे. तृणधान्ये 2.26 टक्क्यांनी महागली. अंडी, मांस आणि मासळीच्या किमती 19.64 टक्क्यांनी वधारल्या आहेत. गेले काही आठवडे सातत्याने घसरण दाखवणाºया कडधान्याच्याकिमती 14.27 टक्के वाढल्या आहेत. तृणधान्ये 2.26 टक्क्यांनी महागली आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात 20 टक्के वाटा असणाºया प्राथमिक वस्तूंच्या किमतीही 7 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 2.47 टक्क्यांवर आल्या आहेत. या आधीच्या आठवड्यात या किमती 0.51 टक्क्यांवर होत्या. तंतुमय पदार्थ, तेलबिया आणि खनिजे यांचा समावेश असलेल्या अखाद्य वस्तूंची महागाई 31 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 1.29 टक्क्यांवर होती. त्यात वाढ होऊन ती आता 1.84 टक्के या पातळीवर आली आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई 14.45 टक्के झाली आहे. त्याआधीच्या आठवड्यातही या क्षेत्रातील महागाई 14.45 टक्केच होती.

आणखी दोन आठवडे ऋणात्मक पातळी
अन्नधान्य महागाईचा निर्देशांक आणखी दोन आठवडे तरी ऋणात्मक पातळीत राहील. मार्चमध्ये यात आणखी वाढ होईल. अन्नधान्य महागाईत सुधारणा होत असली तरी निर्मित वस्तूचे भाव चढेच आहेत. प्रमुख व्याजदरात कपात करण्यापूर्वी आरबीआय काही काळ आणखी प्रतीक्षा करेल, असे आम्हाला वाटते.
डी. के. जोशी, प्रमुख, क्रिसिल

रिझर्व्ह बँकेचे बारीक लक्ष
अखाद्य वस्तू मुख्यत: उत्पादित वस्तूंच्या किमती अजूनही चढ्याच आहेत. मार्च 2012 पर्यंत अन्नधान्य महागाई पुन्हा 6 ते 6.5 टक्क्यांची पातळी गाठण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रमुख व्याजदरात कपात करण्यापूर्वी रिझर्व्ह बँक या बाबींचा निश्चितच विचार करेल.
अदिती नायर, अर्थतज्ज्ञ, इक्रा