आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inflation Spoiled Budget, Vegatable Price Go High

महागाईमुळे बिघडणार बजेट, स्वयंपाक घरातील भाजा झालायत महाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद, मुंबई - यंदा मान्सून चांगला होणार, या वेधशाळेने दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे सर्वच जण सुखावले; पण वरुणराजा इतका बरसला की सामान्यांचा खिसा पार ओला करून टाकला. उत्तराखंडमधील महाप्रलय, कोसळलेल्या दरडी आणि काही राज्यांत लागलेली संततधार यामुळे बाजारात येणारा भाजीपाला खरेदीच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. लालचुटूक टोमॅटो तर इतका महागला आहे की साध्या कोशिंबिरीचादेखील विचार करणे कठीण झाले आहे. देशभरात टोमॅटोचे भाव किलोमागे 60 ते 100 रुपये झाले आहेत.


गेल्या पंधरा दिवसांमध्ये राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या किमतीत तिपटीने वाढ होऊन त्या जवळपास 60 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत. टोमॅटोचे उत्पादन घेणा-या अन्य राज्यांमध्येदेखील पावसाचा कहर सुरू असल्याने या लाल फळभाजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आणखी काही दिवस तरी ही महागाईची कळ सोसावी लागणार आहे.


हरियाणासारख्या काही राज्यांत पावसाची संततधार सुरू असल्यामुळे टोमॅटो तोडण्यावर परिणाम होऊन त्याच्या पुरवठ्यात अडथळे येत असल्याचे फलोत्पादन आयुक्त गोरख सिंग यांनी सांगितले. उत्तराखंडसह हरियाणा, मध्य प्रदेश आणि पूर्व पंजाबमध्ये पावसामुळे टोमॅटो तोडण्याच्या कामात अडथळा येत आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोचे पीकदेखील खराब होत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंग म्हणाले की, टोमॅटोची तोडणी, वाहतूक आणि साठवणूक यामध्ये अडथळा येत आहे.पावसाळ्यात भाजीपाल्याच्या किमती काहीशा चढ्या असतात. उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. त्याचा टोमॅटोच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन दिल्ली बाजारात टोमॅटोच्या किमती भडकल्या असल्याचे ते म्हणाले. यंदा 18 दशलक्ष टन टोमॅटोचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.


विविध बाजारपेठांतील टोमॅटोचे दर
० मुंबईतही तीन महिन्यांपूर्र्वी 20 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता 50 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
० राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या किमतीत तिपटीने वाढ होऊन त्या जवळपास 60 रुपये किलोपर्यंत गेल्या
० औरंगाबादेत महिन्यापूर्वी 20 ते 25 रुपये किलो असणारा टोमॅटो सध्या 50 ते 60 रुपये किलो झाला आहे.


औरंगाबादेत भाव 60 रुपये
मोंढ्यात टोमॅटोची आवक घटली आहे. कन्नड, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासा आणि राजस्थान येथून 200 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. मोंढ्यात 30 ते 35 रुपये किलो भाव आहे तर किरकोळ बाजारात टोमॅटो 50 ते 60 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. संजय गायकवाड, बाजार अधीक्षक, औंरगाबाद.