आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिस इफेक्ट: सेन्सेक्स, रुपया, सोने घसरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीमधील काही संस्थापकांनी एक अब्ज डॉलर मूल्याचे समभाग विकण्याचा घेतलेला निर्णय बाजाराला चटका लावून गेला. त्यातच मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीच्या मा-यात टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेला फटका बसल्याने सेन्सेक्स ३३९ अंकांनी तर निफ्टी १०० अंकांनी घसरला. गेल्या आठ आठवड्यांतील सेन्सेक्सची ही मोठी घसरण आहे.

एचडीएफसी बँक, आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने दिवसभरात २८,०९७.१२ अंकांची नीचांकी पातळी गाठली. परंतु नंतर बाजारात झालेल्या मोजक्या खरेदीमध्ये सेन्सेक्सने पुन्हा एकदा २८,४९४.८५ अंकांची कमाल पातळी गाठली. नंतर पुन्हा एकदा विक्रीचा मारा सुरू झाला आणि तो आणखी व्यापक झाला. त्यामुळे सेन्सेक्स दिवसअखेर ३३८.७० अंकांनी घसरून २८११९.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारीदेखील नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स १०४.७२ अंकांनी गडगडला होता. याअगोदर १६ ऑक्टोबरला सेन्सेक्स ३४९.९९ अंकांनी घसरला होता. त्यानंतरची ही मोठी घट आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील १००.०५ अंकांनी घसरून ८५०० अंकांच्या खाली जात ८४३८.२५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

सोने : घसरण सुरूच
ज्वेलर्स आणि रिटेलर्स यांच्याकडून मागणी घटल्याचा दबाव सोन्याच्या किमतीवर दिसून आला. राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे २५ रुपयांनी घटून २६,६५० झाले. चांदीच्या किमती किलोमागे ५० रुपयांनी घसरून ३६,६५० झाल्या. सराफा व्यापा-यांनी सांगितले, जागतिक सराफ्यातील नरमाई, अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी आणि बळकट होणारा डॉलर यामुळे सोन्यावर दबाव दिसून आला. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.४ टक्क्यांनी घसरून ११८७.२७ डॉलर झाले.

आयटी समभागांना फटका
बाजारात प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान समभागांच्या झालेल्या विक्रीत इन्फोसिस (- ४.८८%), टीसीएस (- २.५१ %) आणि विप्रो (- १.६२ %) या समभागांना मोठा फटका बसला.

रुपयाची आपटी
दोन आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर असलेल्या रुपयाला सोमवारी चांगलाच धक्का बसला. आयातदारांकडून डॉलरला आलेल्या चांगल्या मागणीमुळे रुपयाने आपटी खाल्ली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६ पैशांनी घसरून ६१.८३ वर आला. विदेशी मुद्रा विनिमय बाजारात डॉलरचे मूल्य पाच वर्षांच्या उच्चांकी पातळीवर आल्याचा दबावही रुपयाच्या मूल्यावर दिसून आला.

धातू समभाग वितळले
चीनच्या निराशाजनक व्यापार कामगिरीचा चटका बसून धातू कंपन्यांचे समभाग वितळले. त्यात प्रामुख्याने सेसा गोवा, हिंदाल्को आणि टाटा स्टील या कंपन्यांचा समावेश होता.