आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फोसिसचे निकाल अन् आर्थिक आकडे देणार बाजाराला दिशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील शटडाऊनची वाढती चिंता आणि कर्ज मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यांवर अमेरिकेच्या संसदेत होणारी चर्चा या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने चांगली लवचिकता दाखवली आहे. विदेशी संस्थांकडून चांगली खरेदी सुरू राहिल्याने मागील आठवड्यात बाजार तेजीसह बंद झाले. विदेशी संस्थांकडून बाजारात डॉलरचा ओघ सुरूच आहे, त्यामुळे रुपयाला स्थैर्य येत आहे. बाजारातील ही बरी स्थिती असल्याने सर्व क्षेत्रातील समभाग वधारलेले दिसत आहेत. आयटी आणि फार्मा निर्देशांकांनी चांगली वाढ नोंदवली आहे. या क्षेत्रातील काही समभागांनी ऑ ल टाइम उच्चांकाला स्पर्श केला आहे.


सणांमुळे विक्री वाढीची आशा असलेल्या रिअ‍ॅल्टी, बँकिंग आणि ऑ टोसारख्या व्याजदर संवेदनशील समभागात चांगली तेजी दिसून आली. काही आठवड्यांपूर्वी या समभागाच्या हालचालीसाठी योग्य दिशाच मिळत नव्हती. मात्र सणाच्या हंगामाने उत्साह दिसून येत आहे. अनेक महिन्यांनंतर ऑटो उद्योगात सुधारण्याची किरणे दिसत आहेत. या शिवाय टिकाऊ वस्तू आणि वाहन खरेदीसाठी स्वस्त कर्ज देता यावे म्हणून सरकारने बँकांना खेळत्या भांडवलाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेही या क्षेत्रातील समभागात चमक दिसून येत आहे.


दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने सात ऑक्टोबर रोजी ओपन मार्केट ऑ परेशन (ओएमओ) आणि नंतर मार्जिनल स्टॅण्डिंग फॅसिलिटी (एमएसएफ) आणि बँक रेटमध्ये अर्धा-अर्धा टक्के कपात केल्याने बँकांची रोख निधीची चणचण दूर झाली आहे. अपेक्षेपेक्षा लवकरच ही पावले उचलण्यात आल्याने सरकारकडून कॅश मॅनेजमेंट बिल्सच्या (सीएमबी) कालावधीत वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची परिपक्वता पुढील आठवड्यात असून त्यामुळे बाजारातील रोख निधीचा प्रवाह आणखी सुरळीत होणार आहे. असे असले तरी सर्व काही आलबेल नाही. एचएसबीसीच्या सेवा क्षेत्राच्या सप्टेंबरमधील पर्चेसिंग मॅनेजर निर्देशांकात घसरण झाली आहे. त्याने चार वर्षांचा नीचांक गाठला आहे. ज्या सेवा क्षेत्राकडून भरपूर अपेक्षा होत्या त्यावर या आकडेवारीने पाणी फेरले आहे. एकूणच विचार करता बाजाराचा कल सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत.इन्फोसिसचे निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहेत. हे निकाल चांगले असतील अशी सध्या बाजाराची धारणा आहे.


आगामी काळात बाजार एका मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे. सर्वांची नजर अमेरिकेतील घडामोडींवर आहे. तेथील सरकारी शटडाऊन आणि कर्ज मर्यादा वाढवण्याचा गुंता सुटल्यास जगभरातील बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. कंपन्यांचे आर्थिक निकाल बाजाराला दिशा देण्याचे काम करतील मात्र ते ट्रिगर नसतील. कारण येत्या काही दिवसांत काही प्रमुख आकडेवारी जाहीर होणार आहे. इन्फोसिसच्या निकालाशिवाय बाजाराची नजर, औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या ऑ गस्टमधील कामगिरीवर राहील. ही आकडेवारी शुक्रवारी जाहीर होणार आहे. गुरुवारी देशातील व्यापारविषयक आकडेवारी जाहीर होईल. त्यावरून आयात-निर्यातीचा अंदाज बांधता येईल. सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी ठोक आणि किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. ठोक महागाईत वाढ झाल्यास बाजारात घसरणीची शक्यता आहे. एकूणच अनेक आकडेवारी जाहीर होणार असल्याने हा आठवडा अनेक हालचाली दर्शवणारा ठरणार आहे.


बाजार सध्या खालच्या स्तराच्या शोधात आहे. निफ्टी 5911 ते 5881 या कक्षेत राहण्याची शक्यता आहे. या स्तराखाली बंद झाल्यास निफ्टीत आणखी घसरण होईल. त्याला 5802 वर चांगला आधार आहे. ही एक चांगली आधारपातळी आहे. त्याखाली आल्यास निफ्टी 5687 पर्यंत खाली येऊ शकतो. वरच्या दिशेने निफ्टीला 5951 वर पहिला अडथळा होईल. चांगल्या व्हॉल्यूमसह हा अडथळा पार केल्यास निफ्टी 6048 पर्यंत मजल मारू शकतो. ही एक तगडी अडथळा पातळी आहे. याआधीच निफ्टीला 5991 वर इंटरमीडिएट रेडिस्टंट आहे.


शेअर्सच्या बाबतीत सांगायचे झाले तर या आठवड्यात आयसीआयसीआय बँक लिमिटेड, टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो हे समभाग चार्टवर उत्तम दिसताहेत. आयसीआयसीआय बँकेचा मागील बंद भाव 937.10 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 952 रुपये तर स्टॉप लॉस 918 रुपये आहे. टायटन इंडस्ट्रीजचा मागील बंद भाव 241 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 248 रुपये तर स्टॉप लॉस 233 रुपये आहे. लार्सन अँड टुब्रोचा मागील बंद भाव 828.40 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 846 रुपये तर स्टॉप लॉस 804 रुपये आहे.


- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.