आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईचा पतंग कटला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अन्नपदार्थांच्या किमती उतरल्याने डिसेंबर 2011 मध्ये मुख्य महागाई निर्देशांक 7.47 टक्क्यांवर आला आहे. हा गेल्या दोन महिन्यांतील नीचांक आहे. मात्र, उत्पादित वस्तूंच्या किमती अजूनही चढ्याच असल्याने आगामी नाणेनिधी धोरण आढाव्यात भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य व्याजदरात कपात करणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले काही महिने उंच उडणारा महागाईचा पतंग मात्र कटला आहे.
घाऊक किंमत निर्देशांक म्हणून गणण्यात येणारा मुख्य महागाई निर्देशांक नोव्हेंबर 2011 मध्ये 9.11 टक्के होता. डिसेंबर 2010 मध्ये हा निर्देशांक 9.45 टक्के होता. डिसेंबर 2011 मध्ये हा निर्देशांक 7.47 टक्क्यापर्यंत घसरला आहे. यापूर्वी डिसेंबर 2009 मध्ये महागाई निर्देशांक 7.15 टक्के या पातळीवर होता. सरकारकडून सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार वार्षिक तुलनेत भाजीपाला 34.18 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. बटाटा 35.45 टक्के, तर कांद्याच्या किमती 60.45 टक्क्यांनी उतरल्या आहेत. घाऊक किंमत निर्देशांकात अन्नपदार्थांचा वाटा 14.3 टक्के असतो. नोव्हेंबर 2011 मध्ये 8.53 टक्क्यांवर असणारी प्राथमिक वस्तूंची महागाई आता 3.07 टक्क्यांवर आली आहे. तंतुमय पदार्थ आणि तेलबियांचा समावेश असणाºया अखाद्य वस्तूंच्या महागाईत सुधारणा झाली आहे. नोव्हेंबर मध्ये 3.22 टक्के असणारी अखाद्य वस्तूंची महागाई आता 1.48 टक्क्यांवर आली आहे. घाऊक निर्देशांकात 65 टक्के वाटा असणाºया उत्पादित वस्तूंच्या महागाईत मात्र फारशी सुधारणा दिसून आलेली नाही. नोव्हेंबरमध्ये उत्पादित वस्तूंची महागाई 7.70 टक्क्यांवर होती, ती आता 7.41 टक्क्यांवर आली आहे. फेब्रुवारी 2011 पासून 6 टक्क्यांची पातळी ओलांडलेल्या उत्पादित वस्तूंतील महागाईने सतत चढता आलेख दर्शवला आहे. उत्पादित वस्तूंपैकी लोह आणि तत्सम वस्तूंच्या किमतीत 24.44 टक्के वाढ झाली आहे, तर खाद्य तेल 11.52 टक्क्यांनी महागले आहे. तंबाखूजन्य पदार्थ 13.18 टक्क्यांनी, तर मूळ धातूंच्या किमती 12.96 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ऊजा, इंधन क्षेत्रातील महागाईत 15.48 टक्क्यांवरून 14.91 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

मार्चअखेर महागाई 6 ते 7 %
डिसेंबरमधील मुख्य महागाईने चांगलीच सुधारणा दाखवत दोन वर्षांतील खालची पातळी गाठली आहे. मार्चअखेर हा दर 6 ते 7 टक्क्यांपर्यंत खाली येईल. अन्नधान्य महागाईत तसेच प्राथमिक वस्तूंच्या किमती उतरल्याने मुख्य महागाई उतरण्यास मदत झाली आहे. मात्र, उत्पादित वस्तू आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई अजूनही चिंतेचा विषय आहे.
प्रणव मुखर्जी, अर्थमंत्री

आरबीआयला मिळणार मुभा
महागाईत झालेल्या घसरणीमुळे आरबीआयला आपले कडक धोरण शिथिल करण्यात मुभा मिळणार आहे. आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठी आरबीआयला आता मोकळीक मिळणार आहे. महागाईच्या आगाडीवर अजूनही काही घटकांबाबत दबावाची स्थिती आहे,मात्र मार्चपर्यंत हा दबाव कमी होईल
माँटेकसिंग अहलुवालिया, उपाध्यक्ष, नियोजन आयोग