आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाणी टाका, रेल्वे तिकीट मिळवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : अत्यंत गर्दीच्या रेल्वेस्थानकावर तिकीट खरेदीसाठी काय दिव्यातून जावे लागते, याचा अनुभव प्रत्येकाच्या गाठी आहेच. प्रवाशांची नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी अशा स्थानकावर ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम) लावण्यात आल्या होत्या. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे या मशीन प्रवाशांना आकर्षित करू शकल्या नाहीत. आता रेल्वेने अशा स्थानकावर अत्याधुनिक मशीन लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात चलनी नोटा तसेच नाणी टाकल्यानंतर तिकीट हाती पडणार आहे. पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या 3000 मशीन खरेदी करण्यात आल्या असून त्या लावण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍ यांच्या मते जेथे या मशीन लावायच्या आहेत अशा देशभरातील जास्त वर्दळीच्या रेल्वेस्थानकांची निवड निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून मशीन येणार आहेत.
या कामी सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिमला (क्रिस) नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मशीन मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वे विभागात लावण्यात येणार आहेत.
या दोन्ही विभागांत प्रत्येकी 600 मशीन लावण्यात येणार आहेत. उत्तर रेल्वेला सुमारे 250 मशीन देण्यात आल्या आहेत. पूर्व रेल्वेला 450, दक्षिण-मध्य रेल्वेला 150, दक्षिण-पूर्व रेल्वेला 100, उत्तर-पश्चिम रेल्वेला 150 आणि दक्षिण रेल्वेला 300 मशीन मिळणार आहेत.
रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम लावण्याची सुरुवात अनेक वर्षांपूर्वीच झाली आहे. मात्र, सध्या जे एटीव्हीएम लावण्यात आले आहेत, त्यात केवळ स्मार्ट कार्डद्वारेच व्यवहार करता येतो. सध्या अशा मशीनद्वारे तिकीट खरेदी करायचे असेल तर तिकीट खिडकीवर जाऊन आधी स्मार्ट कार्ड खरेदी करावे लागते आणि त्यात वेळोवेळी पैसे भरावे लागतात. दररोज रेल्वेने प्रवास करण्यासाठी हे सुलभ आहे. मात्र, अधूनमधून प्रवास करण्यासाठी ही सुविधा असून अडचण ठरली होती. तसेच एका रेल्वे विभागाचे स्मार्ट कार्ड दुसर्‍ या विभागात चालत नाही. या सर्व गैरसोयी लक्षात घेऊन आधुनिक एटीव्हीएम मशीन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात चलनी नोटा किंवा नाणे टाकल्यानंतर तिकीट मिळणार आहे. रेल्वे तिकीट खरेदी करायचे असेल तर मशीनमध्ये नोट किंवा नाणी टाकल्यानंतर तिकीट हाती पडणार आहे. पैसे काढण्याच्या एटीएमप्रमाणेच नवे एटीव्हीएम आहे.
नव्या एटीव्हीएम मशीनच्या खर्चाबाबत विचारले असता अधिकार्‍ याने सांगितले की, स्मार्ट कार्डच्या एटीव्हीएम मशीनची किंमत दीड लाख रुपये आहे, तर आधुनिक एटीव्हीएम मशीनची किमत आठ लाख रुपये आहे. एचसीएल, टाटा समूहातील फोर टेक्नो सिस्टिम, एक्सल टेक्नॉलॉजी आदी कंपन्या आधुनिक एटीव्हीएम मशीनची निर्मिती करतात.
लवकरच लागणार मशीन
० पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या 3000 मशीन्स खरेदी करण्यात आल्या असून त्या लावण्याचे काम पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या लागते स्मार्ट कार्ड
० सध्या जे एटीव्हीएम लावण्यात आले आहेत त्यात केवळ स्मार्ट कार्डद्वारेच व्यवहार करता येतो.
स्टेशन निवड
० देशातील अतिवर्दळीच्या रेल्वेस्थानकावर आधुनिक एटीव्हीएम मशीन लावण्यात येणार आहेत.
० पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मशीन मध्य व पश्चिम रेल्वेला मिळणार आहेत.