आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interest Hikes Effected All Business Community, Reserve Bank Declared Monetary Policy

व्याजवाढीच्या राम‘बाणा’ने सारेच घायाळ, रिझर्व्ह बँकेने केले तिमाही पतधोरण जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो दरात पाव टक्का वाढ केली. गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी महागाई नियंत्रणाला जास्त महत्त्व देत रिव्हर्स रेपो दर तसेच एमएसएफ दरात प्रत्येकी पाव टक्का वाढ केली. या वाढीमुळे आधीच त्रस्त असलेल्या उद्योग जगताला मोठा धक्का बसला. रिअ‍ॅल्टी क्षेत्रातूनही या वाढीबाबत निराशेच्या प्रतिक्रिया उमटल्या, तर बँकांनी काही निर्णय घेण्यापूर्वी वेट अँड वॉच धोरण स्वीकारले. डॉ. रघुराम राजन यांच्या व्याजवाढीच्या बाणाने सर्व क्षेत्रे घायाळ झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
पतधोरणाची ठळक वैशिष्ट्ये
० प्रमुख व्याजदरांत पाव टक्क्याने वाढ. रेपो दर आता 8 टक्के
० रोख राखीव प्रमाण चार टक्क्यांवर स्थिर
० मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर 9 टक्क्यांवर कायम
० विद्यमान आर्थिक वर्षात विकासदरात पाच टक्क्यांपेक्षा कमी वाढ
० पुढील आर्थिक वर्षात आर्थिक विकासदरात 5.5 टक्क्यांपर्यंत सुधारणा
० चालू खात्यातील तूट यंदाच्या वर्षात 2.5 टक्क्यांपेक्षा कमी राहणार
० मार्चअखेरपर्यंत महागाई आठ टक्क्यांच्या वर जाण्याचा अंदाज
० अर्थव्यवस्थेतील मरगळ चिंतेची बाब
० आर्थिक स्थिरता आणण्याच्या दृष्टीने वित्तीय आणि नाणेनिधी अधिकारी सातत्याने कार्यरत राहणार
बांधकाम उद्योगाला हादरा
रिझर्व्ह बँकेच्या पाव टक्का व्याज दरवाढीच्या अचानक धक्क्यामुळे स्थावर मालमत्ता उद्योगाला हादरा बसला आहे. या व्याज दरवाढीचा मालमत्तांच्या विक्रीवर विशेषकरून निवासी मालमत्ता खरेदीदारांच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता विकासकांनी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे; परंतु त्याच वेळी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि सल्लागारांनी कडक नाणेनिधी धोरणाची ही शेवटची फेरी असावी, असा आशावाददेखील व्यक्त केला आहे.
क्रेडाईचे अध्यक्ष ललित जैन म्हणाले, व्याज दरवाढ अतिशय निराशाजनक असून विकासक वर्गाचा त्रास यामुळे आणखी वाढणार आहे. विक्री आणि खेळत्या भांडवलाच्या बाबतीत बाजारपेठेत तळ बघायला मिळणार आहे; परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था आणि बाजाराला चालना देण्यासाठी तीव्र प्रयत्न होतील. आता मार्च आढाव्याचा काय कल असेल याकडे विकासकांचे लक्ष लागले आहे. पार्श्वनाथ डेव्हलपर्सचे प्रदीप जैन यांनी सांगितले, रेपो दरात वाढ करून रिझर्व्ह बँकेने अतिशय निराशाजनक पाऊल उचलले असून यामुळे महागाई कमी होण्याच्या दृष्टीने रिझर्व्ह बँकेला फारशी मदत होणार नाही. अगोदरच कर्जाचे दर अपेक्षेपेक्षा जास्त असून रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे पुन्हा बँकांना ते वाढवणे भाग पडेल; परंतु यामुळे गृह खरेदीदारांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. ब्रिस ग्रुपचे अध्यक्ष राहुल गौर म्हणाले, व्याजदरातील वाढ निराशाजनकच नाही, तर आश्चर्यजनक आहे.
बँकांचे वेट अँड वॉच धोरण
महागाईचा कल पाहून कर्जावरील व्याजदर वाढवायचे की नाही याबाबत निर्णय घेऊ, असे मत बहुतेक बँकांनी व्यक्त केले.
भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले, एसबीआय व्यवस्थापन सायंकाळी बैठक घेणार असून त्यात कर्ज तसेच ठेवींवरील व्याजदरांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रेपो दरवाढीचा निधीवर कसा परिणाम होतो त्यावर व्याजदर वाढ अवलंबून आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या एमडी चंदा कोचर म्हणाल्या, तूर्त तरी कर्ज महागण्याबद्दल भाष्य करणे घाईचे ठरेल, कारण महागाईचा कल पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे. गृहवित्त पुरवठा क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसीचे एमडी आणि सीईओ अदित्य पुरी म्हणाले, की रेपो वाढीचा परिणाम ठेवींवर कशा प्रकारे होतो हे प्रथम तपासावे लागेल आणि कर्जाची मागणी कशी आहे त्यावर बरेच अवलंबून राहील.
पंजाब नॅशनल बँकेचे सीएमडी के. आर. कामत यांनीही अशीच प्रतिक्रिया नोंदवली.
उद्योग क्षेत्राची अपेक्षा : रिझर्व्ह बँकेने महागाईऐवजी विकासावर लक्ष केंद्रित करावे
रिझर्व्ह बँकेच्या व्याज दरवाढीच्या अचानक गुगलीने उद्योग जगतही क्लीन बोल्ड झाले आहे. रिझर्व्ह बँकेने आता तरी महागाई नियंत्रणाऐवजी आर्थिक वृद्धी आणि गुंतवणुकीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
वाढीला प्राधान्य द्या
चढ्या व्याजामुळे मागणी आटली असून त्याचा परिणाम वृद्धी-घट आणि गुंतवणुकीवर होत आहे. यामुळे पुरवठा साखळीतील अडथळे वाढून महागाईचा ताण वाढत आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने चढ्या व्याजदरांपासून विराम घ्यावा. आवाक्यात आलेली मुख्य महागाई, कमी होत असलेल्या किमती, त्यातून कृषी क्षेत्राने केलेल्या भरीव कामगिरीमुळे महागाई अति नाही. त्यामुळे महागाईच्या ऐवजी आर्थिक वाढीला प्राधान्य देण्याची हीच योग्य योग्य वेळ आहे. सीआयआय.
वृद्धीस मारक धोरण
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण निराशाजनक आहे. गुंतवणूक आणि मागणीतील घट अर्थव्यवस्थेला वृद्धीच्या वाटेवर घेऊन जाण्यात अडथळा ठरत असून त्याची रिझर्व्ह बँकेने दखल घ्यावी. औद्योगिक उत्पादन निर्देशांक नकारात्मक पातळीत असताना पुन्हा व्याजदरात वाढ करणे वाढीस मारक ठरणारे आहे.
फिक्की विचित्र चक्रव्यूह
आर्थिक व्यवस्था सध्या एका विचित्र चक्रात अडकली आहे. रेपो दरातील वाढीमुळे पुन्हा एकदा आर्थिक वाढीवर हातोडा पडणार आहे. असोचेम