आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interest Rate Hit Market, Sensex Fall By 363 Points

बाजाराला व्याजवाढीचा धसका; सेन्सेक्स 363 अंकांनी, निफ्टी 122 अंकांनी आपटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महागाईचा वेलू नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्याच्या भयाने बाजाराचा थरकाप उडाला. यातून झालेल्या विक्रीत सेन्सेक्स 362.75 अंकांनी घसरून 20 हजारांखाली आला. निफ्टीतही 122.35 अंकांची घट दिसून आली. रुपयानेही डॉलरपुढे पुन्हा नांगी टाकल्याचे चित्र सोमवारी बघायला मिळाले. सराफा बाजारातही फारसा उत्साह नव्हता. परिणामी सोने -चांदीच्या किमती घसरल्या.

व्याजदराशी निगडित समभागांना विक्रीचा जोरदार तडाखा बसला. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या दोन्ही समभागांच्या विक्रीने सेन्सेक्सच्या घसरणीत 155 अंकांचा वाटा उचलला. बाजारात सलग दुसर्‍या सत्रात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 362.75 अंकांनी घसरून 19,900.96 वर बंद झाला. निफ्टी 122.35 अंकांच्या घटीसह 5,889.75 वर स्थिरावला. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, टीसीएस आणि इन्फोसिस या समभागांत तेजी दिसून आली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 22 समभागांत घसरण झाली. आशियातील प्रमुख बाजारात संमिर्श कल दिसून आला. चीनमधील उत्पादनाच्या आकडेवारीत अपेक्षेपेक्षा जास्त वाढ आल्याने चीन, दक्षिण कोरियाच्या बाजारात तेजी आली, तर हाँगकाँग आणि सिंगापूर बाजार मात्र घसरले. युरोपातील र्जमनी, ब्रिटनच्या बाजारात तेजी दिसून आली.
घसरणीची कारणे :

-यंदाच्या डिसेंबरअखेर रिझर्व्ह बँक रेपो दर 8 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता ब्रिटनमधील स्टँडर्ड चार्टर्डने वर्तवली.

- नोमुरा या जपानच्या संस्थेने रिझर्व्ह बँक रेपो दरात आगामी काळात आणखी 0.50 टक्के वाढ करण्याचा अंदाज व्यक्त केला.

- क्रेडिट सुईसनेही रिझर्व्ह बँक आगामी काळात किमान दोन वेळा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तवली.
रुपया 37 पैशांनी घसरून 62.60 वर

आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मोठय़ा मागणीमुळे रुपयाची सोमवारी घसरण झाली. त्यातच शेअर बाजार गडगडल्याचा दबाब रुपयावर दिसून आला. डॉलरच्या तुलनेत रुपया 37 पैशांनी घसरून 62.60 वर आला. आशियातील सर्व प्रमुख चलनांची डॉलरच्या तुलनेत घसरण दिसून आली. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी शुक्रवारी शेअर बाजारातून 214.77 डॉलरचा निधी उपसला. रुपयातील या घसरणीने घाबरून जाण्यासारखे काही नसल्याचे मत आर्थिक व्यवहार सचिव अरविंद मायाराम यांनी व्यक्त केले. रुपया 58 ते 60 या पातळीत स्थिरावण्याची शक्यता मायाराम यांनी व्यक्त केली.
सोने स्वस्त, चांदीही घसरली

घटलेली मागणी आणि जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत यामुळे सराफा बाजारात सलग तिसर्‍या सत्रात घसरण दिसून आली. दिल्लीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 250 रुपयांनी स्वस्त होऊन 30,250 रुपये झाले. चांदी किलोमागे 475 रुपयांनी घसरून 49,025 वर आली. सध्या सुरू असलेल्या पितृपक्षामुळे मौल्यवान धातूंची मागणी घटल्याचे सराफा व्यापार्‍यांनी सांगितले. त्यातच जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक घडामोडींनी सोन्याच्या घसरणीला अधिक बळ मिळाल्याचे व्यापार्‍यांनी स्पष्ट केले. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 0.9 टक्क्यांनी घसरून 1313.69 डॉलरवर आले. चांदीही औंसमागे 1.4 टक्क्यांनी घटून 21.48 औंस झाली. गेल्या तीन सत्रांत सोने तोळ्यामागे 560 रुपयांनी, तर चांदी किलोमागे 2175 रुपयांनी स्वस्त झाली आहे.