आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interest Rates May Fall As Inflation Slows To 3 year Low

महागाईचा पारा उतरला...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजीपाला आणि फळे या सर्वात महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होऊन मार्च महिन्यात तीन वर्षांचा नीचांक गाठल्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यात महागाईचा दर घसरून 5.96 टक्क्यांवर आल्यामुळे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर हा गेल्या वर्षातल्या मार्च महिन्यातील 7.69 टक्क्यांवरून घसरून यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात 6.84 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या 6.8 टक्के अंदाजाच्या तुलनेत मार्च महिन्यात महागाईचा दर लक्षणीय घसरून 5.96 टक्क्यांवर आला आहे.
सरकारने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उत्पादित गटातील महागाईचे प्रमाण हे फेब्रुवारी महिन्यातील 4.51 टक्क्यांवरून घसरून मार्च महिन्यात 4.07 टक्क्यांवर आले आहे. घाऊक किंमत निर्देशांकात 14.34 टक्के वाटा असलेल्या अन्नधान्य गटातील महागाईचा दरदेखील फेब्रुवारीतील 11.38 टक्क्यांवरून कमी होऊन मार्चमध्ये 8.73 टक्क्यांवर आला आहे.

अन्नधान्याच्या महागाईचे प्रमाण घटल्यामुळे भाजीपाल्याच्या किमतीदेखील लक्षणीय कमी होऊन त्या अगोदरच्या महिन्यातील 12.11 टक्क्यांवरून मार्च महिन्यात - 0.95 टक्क्यांवर आल्या आहेत. कांद्याच्या किमतीतदेखील लक्षणीय घट होऊन त्या फेब्रुवारी महिन्यातील 154.33 टक्क्यांवरून 94.85 टक्क्यांपर्यंत खाली घसरल्या आहेत. तांदळाची महागाईदेखील 18.84 टक्क्यांवरून 17.90 टक्क्यांवर आली आहे.

विकासाचे चक्र गतिमान करण्यासाठी यंदाच्या वर्षात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात दोन वेळा पाव टक्क्याने कपात केली. आर्थिक विकासदर पाच टक्क्यांपर्यंत घसरल्यामुळे उद्योग क्षेत्रानेदेखील व्याजदर कपात करण्याची मागणी केली आहे. परंतु शेवटच्या व्याजदर कपातीनंतर रिझर्व्ह बँकेने भविष्यात व्याजदर कपातीची मदार ही महागाईवर अवलंबून असेल, असा सावध इशाराही दिला होता. दुस-या बाजूला सरकारही पुरवठा साखळीतील अडथळे दूर करून महागाई नियंत्रणात आणणे तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी गुंतवणूक आकर्षित करणे असे विविध उपाय करीत आहे. त्यामुळे मार्च महिन्यात घटलेली महागाई आणि फेब्रुवारी महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची मंदावलेली गती लक्षात घेऊन 3 मे रोजी सादर होणा-या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा आता बँका, उद्योग क्षेत्रासह सर्वसामान्यांना वाटत आहे.


फळे, भाजीपाला स्वस्त
फळे आणि भाजीपाल्याच्या किमती प्रामुख्याने कमी झाल्यामुळे घाऊक किमतीवर आधारित निर्देशांक खाली आला आहे, परंतु किरकोळ महागाई दोनअंकी पातळीवर असल्याने महागाई अद्याप वरच्या पातळीवर दिसत आहे.

ताण कमी
महागाईचा ताण सातत्याने कमी होत आहे. चलनवाढ हळूहळू नियंत्रणात येत असल्याच्या सरकारच्या वक्तव्यानुसारच चलनवाढीची सध्याची परिस्थिती दिसून येत आहे.
माँटेकसिंग अहलुवालिया, उपाध्यक्ष, नियोजन आयोग

उद्योगाला दिलासा मिळावा
महागाईमध्ये जवळपास एक टक्क्याने कपात झाल्यामुळे उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. महागाई कमी झाल्यामुळे एकप्रकारे रिझर्व्ह बँकेलादेखील आपल्या कडक भूमिकेवर विचार करण्याचे आणि व्याजदर आणखी कमी करण्याचे एक प्रकारे संकेत मिळाले आहेत.’’
राजकुमार धूत, अध्यक्ष, असोचेम.

व्याजदर कपात शक्य
मार्चमध्ये जागतिक पातळीवरील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत लक्षणीय घट झाल्यामुळे महागाईमध्ये उतार दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक या वेळी रेपो आणि सीआरआर या दोन्ही व्याजदरात पाव टक्क्याने कपात करेल अशी अपेक्षा आहे.
रूपा नित्सुरे रेगे, मुख्य अर्थतज्ज्ञ, बँक ऑफ बडोदा.