आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investment Decision On Political Situation Is Not Good

'राजकीय परिस्थितीवर गुंतवणुकीचा निर्णय घेणे चुकीचे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- गुंतवणुकीबाबत निर्णय घेताना राजकीय परिस्थितीवर किंवा आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीवर नको इतका भर दिला जातो आहे, अनेकदा शेअर बाजारात गुंतवणुकीच्या चांगल्या संधी येउन जातात त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि ही गुंतवणूक पाच ते दहा वर्षा साठी करायला हवी असा सल्ला रेलिगेअर इन्व्हेस्को म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी वेत्री सुब्रमण्यम यांनी खास मुलाखतीत दिला.

सध्या देशाची अर्थव्यवस्था अवघड वळणावर आहे आणि ती सुधारण्यास पायाभूत सुविधा उभारणीवर भर द्यायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले. भांडवल बाजारात भक्कम स्थिती असलेल्या रेलिगेअरने अमेरिकेतील अटलांटा येथील इन्व्हेस्को या जागतिक मालमत्ता व्यवस्थापन कंपनीच्या सहयोगाने भारतात आणि चीनमध्ये साहस वित्त कंपनी स्थापन केली आहे. इन्व्हेस्कोने आशियात फक्त चीन आणि भारतात स्थानिक कंपनीच्या मदतीने प्रवेश केला आहे. इन्व्हेस्को सध्या 700 अब्ज डॉलर निधीचे व्यवस्थापन करते. सुब्रमण्यम पुढे म्हणाले की सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा माहोल असल्याने गुंतवणूकदार त्यावर अधिक भर देताना दिसतात. राजकारण आणि निवडणुका या कायम होत राहणार तेव्हा बाजारात चांगली संधी येते. तेव्हा चांगल्या कंपन्यांचे शेअर खरेदी करायला हवेत आणि सध्या निश्चित उत्पन्न देत असलेल्या योजनात रक्कम गुंतवायला हवी. सध्या देश अवघड आर्थिक स्थितीत आहे. चालू खात्यावरील तूट काहीशी कमी झाली असली तरी महागाई आटोक्यात आलेली नाही. अनेक चांगल्या कंपन्या सध्या नवी मालमत्ता निर्माण करण्यापेक्षा आहे. ती विकून भांडवल गरज पूर्ण करत आहेत. बँकांची वाढती थकीत कर्जे हाही चिंतेचा विषय आहे. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हकडून होत असलेली रोखे खरेदी भविष्यात कमी होणार हे लक्षात घेऊन पावले टाकायला हवीत. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीत पैसा गुंतवण्यास सरकारने प्राधान्य द्यायला हवे. धोरण कर्त्यांनी त्यासाठी निर्णय लवकर घायला हवेत.

रुपया घसरल्याने निर्यातदाराना फायदा होत असला तरी आयातीपेक्षा देशात उत्पादन कसे वाढेल हे महत्वाचे आहे. ते म्हणाले, रिझर्व्ह बँकेने रुपया काहीसा सावरल्यावर परकी चलनातील अनिवासी ठेवीमार्फत 30 अब्ज डॉलर जमा केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आता रुपया नैसर्गिकरीत्या स्थिर होऊ देणे गरजेचे आहे. या स्थितीत गुंतवणूकदाराने धीर धरणे महत्वाचे आहे.

ही स्थिती केवळ भारतात नाही तर जगभर आहे.
सेबीने दिलेल्या मान्यतेनंतर येत्या जानेवारीपासून फिडर फंड माध्यमातून आम्ही निधी भारतात आणणार आहोत. इन्व्हेस्कोच्या काही योजना येथे सुरु केल्या जातील, येथील उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी परकी गुंतवणूक संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रात आमचे चांगले जाळे असून सध्या मुंबई पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर येथे शाखा आहेत. नागपुरातून अमरावतीच्या ग्राहकांना सुविधा दिली जाते.

भारत आणि चीनची तुलना कशी कराल असे विचारता ते म्हणाले, की चीन भारताच्या कितीतरी पट पुढे आहे. चीन प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करतो मात्र त्या तुलनेत तिथे वस्तू आणि सेवा उपभोगाचे प्रमाण कमी आहे. भारतात त्याउलट स्थिती आहे. अंशदानावर आधरित उपभोगाचे प्रमाण वाढते आहे आणि पायाभूत सुविधात मात्र गुंतवणूक कमी होते आहे. हे लक्षात घेऊन धोरणे राबवायला हवीत.