आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूक: सोन्यातील गुंतवणुकीची झळाळी पडली फिकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विविध बाजारपेठांमधील मंदीच्या वातावरणामुळे यंदाच्या वर्षात समभागांच्या तुलनेत सोन्यातील गुंतवणूक फिकी पडलेली दिसून येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमतीत जवळपास 8.5 टक्क्यांनी घट झाली, तर सेन्सेक्स जवळपास 4 टक्क्यांनी घसरला आहे.


गुंतवणुकीबाबत शेअर बाजारावर कुरघोडी करण्याचा अगोदरचा सोन्याचा कल लक्षात घेता सध्या तरी परिस्थिती एकदम उलटी झाली आहे. ही परिस्थिती गेल्या एका दशकापासून कायम होती. सोन्यातील गुंतवणुकीपासून परावृत्त करून समभागांसारख्या उत्पादक मालमत्तांमध्ये ही गुंतवणूक वळवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. परंतु तरीही आतापर्यंत सोन्यातील गुंतवणुकीलाच पहिली पसंती देण्यात येत होती.


अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आर्थिक सहायता कार्यक्रम नियोजित वेळेअगोदरच बंद करण्याचे फेडरल रिझर्व्हने दिलेले संकेत, विक्रमी फुगलेली देशातील चालू खात्यातील तूट आणि रुपयाचे अवमूल्यन या सगळ्या वाईट घडामोडींमुळे गेल्या काही आठवड्यांपासून बाजाराला धक्के बसत आहेत. ज्या वेळी समभागांच्या किमती वाढतात त्या तुलनेत सोन्याच्या किमती घसरतात.


शेअर बाजारात तेजी येते त्या वेळी सोन्याच्या किमतीत फारशी वाढ झालेली दिसून येत नाही. साधारणपणे भांडवल बाजारात भीती आणि चिंतेचे वातावरण असते त्या वेळी साधारणपणे गुंतवणुकीचा ओढा सोन्याकडे जातो, याकडेही बाजारातील तज्ज्ञांनी लक्ष वेधले. सोने ही आंतरराष्‍ट्रीय कमॉडिटी असून तिचा संबंध प्रामुख्याने विदेशी शेअर बाजाराशी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेतील शेअर बाजारात तेजी येते आणि भांडवल बाजारातही वाढ होते. त्या वेळी सोन्यातील गुंतवणूक आपोआपच बाहेर पडते. परंत जेव्हा रुपयाचे अवमूल्यन होते त्या वेळी सोन्याच्या किमतीतही आपोआप वाढ होते याकडे रेलिगेअर सिक्युरिटीजच्या संशोधन प्रमुख राजेश जैन यांनी लक्ष वेधले. गेल्या 15 पैकी 12 वर्षांमध्ये सोन्याने सकारात्मक परतावा दिला आहे. सोन्याच्या किमतीही गेल्या दहा वर्षात 20 टक्क्यांनी वाढल्या तर समभाग किमती 18 टक्क्यांनी वाढल्या.


घसरणीचा सूर
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार विदेशातल्या शेअर बाजारातील तेजीची धारणा आणि देशात सोन्याच्या प्रत्यक्ष खरेदीत झालेली घट यामुळे अलीकडच्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतींनी घसरणीचा सूर लावला आहे. यंदाच्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी शुक्रवार, 9 ऑगस्टपर्यंत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 31,145 रुपयांवरून सध्या 28,500 रुपयांपर्यंत घसरला आहे. केवळ सोनेच नाही, तर सेन्सेक्सही याच कालावधीत 19,580.81 च्या पातळीवरून शुक्रवार, 9 ऑगस्टपर्यंत 18,789.34 अंकांच्या पातळीपर्यंत खाली आला आहे.