आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक करताना सेक्टरविषयी जाणून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर मार्केटमध्ये दीर्घ मुदतीसाठी व फंडामेंटल अनालिसिस करून गुंतवणूक करताना कंपनीची कामगिरी हा घटक महत्त्वाचा आहे. तथापि ती कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये व्यवसाय करत आहे यालाही महत्त्व आहे. कारण प्रत्येक सेक्टरचे काही फायदे-तोटे व गुणधर्म आहेत. त्यांचा त्या सेक्टरमधील कंपन्यांवर अपरिहार्यपणे परिणाम होत असतो. त्यामुळे सेक्टर म्हणजे काय? याविषयी अधिक माहिती घेऊ. ऑटोमोबाइल, बँकिंग व फायनान्शियल, पॉवर, सिमेंट, टेक्स्टाइल्स, आयटी, स्टील, शुगर अशी सुमारे 90 सेक्टर्स आहेत. सुमारे म्हणण्याचे कारण असे की, ऑटोमोबाइल हा एकच सेक्टर धरून त्या खाली चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, ट्रॅक्टर, कार, ट्रक, बसेस इत्यादी मॅन्युफॅक्चर करणार्‍या सर्व कंपन्यांचा आपण त्यात अंतर्भाव करू शकतो किंवा या प्रत्येक प्रकारासाठी वेगळा सेक्टर धरू शकतो. उदा. ऑटोमोबाइल-दुचाकी व तीनचाकी वाहने. यात बजाज ऑटो व हीरो मोटोकॉर्प मुख्यत: येतात. ऑटोमोबाइल-कार व जीप यात मारुती सुझुकी व महिंद्रा इत्यादी येतात. टाटा मोटर्स ही कंपनी कारही बनवते. त्यामुळे ती या प्रकारात येते. सुरुवातीला ती बनवायची अवजड वाहने. त्यामुळे ऑटो लाइट-मीडियम व हेवी कमर्शियल वाहने म्हणजे बसेस, ट्रक या सेक्टरमध्येही ती येते.

अशोक लेलँडही याच सेक्टरमधील. याशिवाय ऑटो-ट्रॅक्टरमध्ये एस्कॉर्ट व एचएमटी इत्यादी कंपन्या येतात. याशिवाय या कंपन्यांना किंवा या वाहनांना लागणारे स्पेअर पाटर््स मॅन्युफॅक्चर करणार्‍या ज्या कंपन्या आहेत त्या ऑटो-अ‍ॅन्सलिअरीज या सेक्टरमध्ये येतात. अमर राजा बॅटरीज, एक्साइड, बोश इत्यादी कंपन्या याच उपसेक्टरमधल्या.

विविध कंपन्यांच्या कामगिरीनुसार शेअर किंमत कमी -जास्त :
ऑटोमोबाइल सेक्टरमधील वेगवेगळ्या कंपन्यांची व्यावसायिक कामगिरी वेगवेगळी असू शकते. त्यामुळे या सेक्टरमधील सर्वच कंपन्यांच्या शेअरचा भावही एकाच दिशेने असतो असेही नाही. विशिष्ट कालावधीत काही कंपन्यांचे शेअरचे भाव वर, तर काहींचे खाली असे असू शकते. पण सर्वसाधारणपणे काही समान अनुमान त्या सेक्टरसाठी काढता येतात. उदा. लोक कार घेतात ते सहसा कर्ज घेऊन. निदान बहुसंख्य लोक वाहन खरेदीसाठी कर्ज घेतात. त्यामुळे बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले किंवा बँकांनी सढळपणे कर्ज देणे कमी केले की कारची मागणी कमी होते. शेअर मार्केट मग या कंपन्यांच्या शेअरचे भाव खाली आणते. आर्थिक मंदीचा काळ असेल तर लोक कार विकत घेणे पुढे ढकलतात. त्यावरून अनुमान काढूनही भाव खाली येतात. स्टील, अ‍ॅल्युमिनियम हे वाहनांच्या निर्मितीसाठी लागणारे काही मुख्य: घटक. विशेषत: स्टील. त्यामुळे यांच्या किमती वाढल्या तर वाहनांच्या किमती त्या प्रमाणात किंवा काही प्रमाणात वाढणार. त्यामुळे विक्रीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. इतकेच काय, स्टील बनवण्यासाठी लोह धातू लागतो. त्याचे भाव वाढले तर स्टीलचे भाव वाढतात. त्यामुळे कारही महाग होतात. असा साखळी परिणाम होतो. अनेक वाहन कंपन्या आपली उत्पादने निर्यात करतात.

2011-12 आर्थिक वर्षात चारचाकी, दुचाकी, तीनचाकी मिळून 2 कोटी 3 लाख वाहनांची निर्मिती :
2011-12 या आर्थिक वर्षात चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वगैरे सर्व मिळून 2 कोटी 3 लाख वाहनांची निर्मिती देशात झाली. त्यापैकी सुमारे तीस लाख वाहने निर्यात केली गेली. त्यात कारच्या निर्यातीने प्रथमच पाच लाखांचा टप्पा ओलांडला. अशी निर्यात ही कंपन्यांसाठी आणि देशासाठी चांगली गोष्ट आहे, पण बाहेरच्या देशात मंदी असेल तरीही या सेक्टरवर प्रतिकूल परिणाम होतो. सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चिंतेचा विषय म्हणजे पेट्रोल, डिझेलचे वाढत जाणारे भाव. ते बघूनच इतकी धडकी भरते की, कार घेण्याचा विचार त्याहीपेक्षा जास्त वेगाने पळून जातो. वाहनांना शहरातून जशी मागणी असते तशीच ग्रामीण भागातूनही असते. पीकपाणी चांगले आले, असली बियाणे मिळाले (!), तिथे सुबत्ता आली तर तिथून वाहनांची मागणी वाढते. ट्रॅक्टर, मोटरसायकल, जीप यांची आधी वाढते. ऑटो- अ‍ॅन्सलिअरीज या सेक्टरची कामगिरी ऑटो सेक्टरवर अवलंबून असते. त्यातील तेजी-मंदीप्रमाणे यातही वारे असते.

ऑटोमोबाइल सेक्टर हे सायक्लिकल म्हणजे तेजी-मंदीचे चक्र असलेले सेक्टर :
ऑटोमोबाइल सेक्टर हे सायक्लिकल म्हणजे तेजी-मंदीचे चक्र असलेले सेक्टर आहे. सतत तेजीत किंवा सतत मंदीत असणारे नाही. त्यामुळे या सेक्टरमध्ये एंट्री घ्यायची असेल, म्हणजे या सेक्टरमधील कंपनीचे शेअर घ्यायचे असतील तर वरील सर्व बाबींचा तसेच सध्या हे सेक्टर तेजीत आहे की मंदीत याचा विचार करावा. सीएनएक्स निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील पन्नास प्रमुख कंपन्यांचा निर्देशांक. याची 25 एप्रिल 13 ला मागील एक वर्षाची कामगिरी बघितली तर या निर्देशांकात 10.24 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. उलट सीएनएक्स ऑटो हा निर्देशांक याच कालावधीत फक्त 2.60 टक्क्यांनी वर गेलेला आहे.

सेक्टरविषयी माहिती घेणे म्हणजे कंपनीच्या व्यवसायाविषयी माहिती घेणे. तुलना करण्यासाठी, त्या सेक्टरमधील लीडर कंपन्या कोणत्या आहेत, आपण निवडलेली कंपनी कितव्या स्थानावर आहे ते जाणून घेण्यासाठी याचा उपयोग होतो. गुंतवणूक करण्यापूर्वी अशी माहिती मिळवणे केव्हाही चांगले. सर्वच सेक्टरचा आपल्याला आढावा घेता येणे शक्य नाही, पण आणखी मोजक्या काही सेक्टरविषयी आपण क्रमाक्रमाने जाणून घेऊ. मात्र, हा आढावा आपण फक्त शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या संदर्भात घेणार आहोत. एकूण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नाही.