आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक का करावी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंतवणुकीला कालमर्यादा नसते. नोकरी तरी संपेल, निवृत्ती घ्यावी लागेल; पण गुंतवणूक मात्र वाढतच जाईल. योग्य मार्गदर्शन मात्र हवे. गुंतवणूक हा असा व्यवसाय आहे, ज्यामध्ये तुम्ही कामावर नसतानाही उत्पन्न चालूच राहते.
मग बचत पुरेशी नाही का?

बचत खात्यापेक्षा कितीतरी जास्त परतावा योग्य गुंतवणूक मिळवून देऊ शकते. वस्तू व सेवा यांच्या किमतीत होणारी वाढ म्हणजे चलनवाढ. चलनवाढीच्या धोक्यामुळे गुंतवणूक आवश्यक ठरते. बचत करून जमा केलेला पैसा चलनवाढीवर मात करू शकत नाही. कारण रुपयाचे मूल्य घसरत जाते. महागाईच्या निर्देशांकापेक्षा जास्त दराने परतावा बचत देऊ शकत नाही. तुमची बचत वाढायला हवी असेल तर तिचे रूपांतर गुंतवणुकीत करावे. मिळणारा परतावा परत गुंतवावा व चक्रवाढ गतीची मजा घ्यावी. गुंतवणुकीत खूप सामर्थ्य आहे.

नुसतीच गुंतवणूकही करू नका
मित्राने, नातेवाइकाने गळ घातली म्हणून गुंतवणूक करू नये. आर्थिक नियोजन करावे. मग त्यासाठी लागणारी आर्थिक उद्दिष्टे ठरवावी व ही ठरवलेली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करावी. नाहीतर 5000 चे 10,000 झाले किंवा 25,000 झाले तरी समाधान वाटणार नाही. पण तेच आपली गरज जर पूर्ण झाली तर योग्य गुंतवणूक केल्याचे समाधान नक्की मिळेल.

मालमत्ता व देणी यातील फरक
मालमत्ता म्हणजे पूर्णपणे आपल्या मालकीची वस्तू; जिच्यावर कुठलेही कर्ज नाही अशी. देणी म्हणजे आपल्यावर असलेले दायित्व. आपले राहते घर जर कर्ज काढून बांधलेले असेल तर ती मालमत्ता नव्हे. ते दायित्व होईल. कारण कर्जाचे हप्ते चालू आहेत. दुसरे उदाहरण म्हणजे गाडी. मालमत्ता वाढवायला हव्यात, दायित्व नको. प्रत्येक वाढणार्‍या दायित्वाबरोबर मालमत्ता वाढवण्याच्या/ पैसे मिळवण्याच्या संधी आपण गमावत असतो. यासाठीच क्रेडिट कार्ड्स वापरण्याचा मोह टाळल्यास उत्तम.

आर्थिक नियोजन करताना
एक प्रकारे सुरक्षा, परतावा, तरलता व करबचत या चार गोष्टी आर्थिक नियोजन करताना अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पण उच्च परताव्यासाठी कधी सुरक्षेला कमी महत्त्व द्यावे लागते. सुरक्षाच हवी असेल तर परतावा कमी मिळतो. वय, आर्थिक गरजा, कुटुंबाचा आकार, इतर कुटुंबीयांच्या इच्छा व उपलब्ध साधने अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या. काही गरजा स्पष्ट असतात तर काहींचा अंदाज करावा लागतो. अडीअडचणीसाठी तरतूद ठेवावी. अग्रक्रम ठरवावे. हे आर्थिक नियोजन स्थिर नसावे. त्याचा आढावा घेत राहावा. कारण कालानुरूप आपल्या इच्छा, गरजा यात बदल होत राहतो. विद्यार्थिदशेत असताना परतावा, सुरक्षा महत्त्वाची ठरते. तरलता व करबचत जबाबदारी नसल्याने कमी महत्त्वाच्या ठरतात. तेच लग्न झाल्यावर तरुणपणी परतावा, करबचत याकडे लक्ष दिले जाते. तरलताही बघावी लागते, तर निवृत्तीनंतर सुरक्षा महत्तवाची ठरते.

आर्थिक नियोजनाचे 3 टप्पे
1) वर पाहिल्याप्रमाणे पहिला टप्पा म्हणजे आपल्या गरजा व स्वप्ने निश्चित करणे. 2) या आपल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी किती काळाने नक्की किती पैसे लागतील हे ठरवणे. उदा. मला 5 वर्षांनी गाडी घेण्यासाठी 10 लाख रु. लागणार आहेत. इथे चलनवाढ लक्षात घ्यावी. 3)वरील आर्थिक गरजांसाठी कोणत्या साधनांमध्ये गुंतवणूक करावी हे निश्चित करणे. साधनांच्या माहितीसाठी सल्लागाराची मदत घेता येईल.