आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुंतवणुकीची साधने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांचे भवितव्य उज्ज्वल असावे, असे प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते. मात्र, शिक्षणाचा वाढता खर्च आणि उत्पन्नाची मर्यादा यामुळे त्यांची काळजी वाढते. अशा स्थितीत उत्तम गुंतवणुकीशिवाय हे लक्ष्य गाठणे कठीण आहे. गुंतवणुकीबाबत बहुतेक पालक संभ्रमात असतात. त्यामुळे एजंटाकडून चुकीची उत्पादने त्यांच्या गळी पडतात. अशा रीतीने गरजेनुसार गुंतवणूक होत नाही. त्यामुळे गुंतवणुकीचा मूळ हेतूच दूर राहतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या विविध साधनांबाबत माहिती असणे आवश्यक आहे. गुंतवणूक चुकीच्या साधनांत होऊ नये आणि हेतू साध्य व्हावा यासाठीही ही माहिती उपयोगी ठरते. त्यामुळेच मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी गुंतवणुकीची साधनांबाबत माहिती देत आहोत.

1. विमा : मुलांसाठीच्या विमा योजना गुंतवणुकीचे उत्तम साधन मानले जाते. गुंतवणुकीबरोबरच विमाधारकाच्या मृत्यूनंतर मिळणारी विमा रक्कम हे या योजनांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मात्र, इतर साधनांचा विचार केल्यास विमा पर्याय थोडा महागडा आहे. पारंपरिक विमा योजना आकर्षक परतावा देत नाहीत आणि युलिप हा मोठा चर्चेचा विषय आहे. युलिपमध्ये खर्च अधिक आहे आणि चांगल्या परताव्यासाठी त्यात दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. तसेच गुंतवणूक रकमेचे व्यवस्थापन हेही युलिपमध्ये कळीचे ठरते. यात गुंतवणूक करण्यापूर्वी युलिप योजनेचे योग्य विश्लेषण करायला हवे. याद्वारे आपल्या गरजा कितपत पूर्ण होतात हे पाहणे गरजेचे ठरते. याची इतर साधनांशी तुलना करून निर्णय घ्यावा. विमा आणि गुंतवणूक यांना वेगळे ठेवल्यास उत्तम.

2. म्युच्युअल फंड : कमी खर्च आणि अनेक पर्याय यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत अनेक संधी आहेत. आपली जोखीम घ्यायची तयारी आणि गुंतवणुकीचा कालावधी याचा विचार करून विविध फंड योजनांचा एक उत्तम प्रतीचा पोर्टफोलिओ तयार करता येतो. यात लवचिकता जास्त प्रमाणात असते. म्हणजेच एखादी फंड योजना अपेक्षित परतावा देत नसेल तर त्यातून लगेच बाहेर पडता येते. तसेच नियमित अंतराने कमी रक्कम गुंतवून आपल्या बचतीचा प्रभावी वापर करता येतो.

3. पीपीएफ : दीर्घकाळाच्या दृष्टीने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रोव्हिडंट फंड-पीपीएफ) हे एक उत्तम साधन आहे. मुले लहान असताना यात गुंतवणूक करून ते कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत चांगली रक्कम जमवता येते. यात 15 वर्षांनंतर मुलगा किंवा मुलगी सज्ञान झाल्यानंतरही गुंतवणूक चालू ठेवू शकतात. पीपीएफला ईईई दर्जा आहे. म्हणजेच यातील गुंतवणूक, परतावा आणि पक्वता यावर कसल्याप्रकारचा कर लागत नाही.गरजेनुसार पीपीएफमधून पैसेही काढता येतात.

4. बँक आवर्ती जमा : समजा गुंतवणुकीचे लक्ष्य कमी काळाचे असेल आणि आपण जास्त कर कक्षेत येत नसला तर बँक आवर्ती जमा (रिकरिंग डिपॉझिट) योजना गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या निश्चित उत्पन्न देणा-या गुंतवणुकीवर आकर्षक व्याज मिळू शकते. मात्र हे दीर्घकालीन साधन नाही. तसेच याच्या व्याजावर लागणार कर परतावा कमी करतो. त्यामुळे गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपली गरज, अपेक्षित परतावा आणि कर पश्चात मिळणारे उत्पन्न याचा सारासार विचार करून या साधनांत गुंतवणूक करावी.

कोणतेही लक्ष्य गाठण्यासाठी केवळ एक साधन उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे आपली गरज आणि जोखमीनुसार विविध साधनांत गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. आपल्या पाल्याच्या भवितव्यातील गरजा आणि उपलब्ध गुंतवणूक साधने यांचा योग्य मेळ साधल्यास पालाचे भवितव्य उज्वल राहील, यात शंका नाही.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.