Home | Business | Share Market | investment, share market, business, national

अक्कलखाती गेलेला पैसा..!

गोपाळ गलगली | Update - Jun 06, 2011, 01:08 PM IST

माणूस आयुष्यभर पैशाचा विचार करत असतो. पैसे मिळवत असतो, खर्च करत असतो.

 • investment, share market, business, national

  rupes_146_01माणूस आयुष्यभर पैशाचा विचार करत असतो. पैसे मिळवत असतो, खर्च करत असतो. आयुष्याच्या संध्याकाळची सोय अनेक ठिकाणी गुंतवून व्याजावर जगत असतो. जेथे व्याज जास्त तेथे गुंतवणूक जास्त करण्याचा त्याचा हव्यास असतो. परंतु आयुष्यातील सर्वच आडाखे बरोबर येतील असे नाही. काही चुका होतात, काही अंदाज चुकतात. फसले जातात. ठेवीचे पैसे अडकतात, बुडतात. धक्का बसतो.

  टिळक डेअरी प्रकरण, सोलापूरचे म्हशीचे प्रकरण, सीआरबी, सुवर्ण सहकारी बँक प्रकरण अशा अनेक बुडीत खात्यात लोकांचे पैसे अडकलेले असतात. लोक हताश होतात. काहींची आयुष्याची पुंजी अडकलेली असते. सभा, निदर्शने होतात. मोर्चे काढण्यात येतात. मात्र, याचा फारसा उपयोग होत नाही. प्रकरण कोर्टात जाते. त्यानंतर ते विस्मरणात जाते.

  आयुष्याची बेगमी करताना असल्या चुका होणारच. म्हणून त्याची दखल घेतली पाहिजे. जास्त व्याजाच्या अपेक्षेने कोठे आपण पैसे गुंतवत आहोत याचा विचार न करता पैसे ठेवले जातात. बक्षिसाची हमी, सुवर्णमुद्रांची लालूच, चांदीच्या नाण्यांची भेट, आपली मुद्दल ओरबाडून घेत असतो,पण आपण मशगूल असतो. काही बँकासुद्धा बुडाल्या आहेत.डिपॉझिट रिस्क, इन्शुरन्सदेखील वर्षानुवष्रे पैसे परत मिळत नाहीत. निवृत्त लोकांना याची फार मोठी झळ बसते. बँक सुरक्षित म्हणून काही निवृत्त लोक आपली पुंजी एकाच बँकेत ठेवतात. ती बँक राष्ट्रीयीकृत असली तर हरकत नाही, परंतु ज्यादा व्याजाच्या आशेने सहकारी बँकेत किंवा पतपेढीमध्ये पैसे गुंतवले जातात आणि हे पैसे अडकतात.

  काही वेळेला मैत्रीखातर उसने दिलेले पैसे परत येत नाहीत किंवा दुसर्‍याला आपण जामीन राहिलेलो असतो आणि त्याने कर्जाची रक्कम न फेडल्यास आपण अडकले जातो. त्याचे पैसे आपल्याला भरावे लागतात. एखाद्या घरात चोरी होते, आयुष्याची कमाई निघून जाते. पत्नीच्या-आईच्या गळ्यातले मंगळसूत्र हिसकावले जाते. भूलथापा देऊन अंगावरचे दागिने उतरविले जातात.प्रवासात बॅगेची चोरी होते. खिसा कापला जातो. कुठे केलेला व्यवहार चुकतो आणि किरकोळ वस्तूला जास्त किंमत दिली जाते. मुलांचा स्वभाव खर्चिक बनतो. तो आपले पैसे उडवतो, पितृप्रेमाने आपण सहन करतो.घराच्या व्यवहारात फसतो. पैसे अडकले जातात, शेअर्सचे भाव रसातळाला जातात. त्यात गुंतवलेले पैसे कवडीमोल होतात.हर्षद मेहताच्या काळात या अनेक लोकांना याची प्रचिती आली आहे. असे अनेक प्रसंग असू शकतात. जेथे आपण कष्टाने मिळविलेला पैसा लुप्त पावतो.

  मग आयुष्यात मिळविलेल्या पैशाचा हिशेब मांडताना असल्या पैशाचे काय. एखादे मोठे आजारपण येते आणि त्यात जमविलेली सर्व पुंजी खर्च होते. मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने या बाबतीत विचार करून त्याची बेगमी करता येते, पण जो पैसा व्यर्थ जाणार असतो, त्याचाही अंदाज करता आला पाहिजे.याला contingency म्हणतात. एकूण हिशेब मांडताना किंवा बजेट करताना होणार्‍या खर्चापेक्षा पाच-दहा टक्के जास्त खर्च येतो, असे गृहीत धरले पाहिजे किंवा पाच ते दहा टक्के कमीच येईल, असे गृहीत धरले पाहिजे. असे केले तर मोठा धक्का बसणार नाही. जर सगळे व्यवस्थित झाले, धरलेला पाच ते दहा टक्के खर्च जास्त करावा लागला नाही किंवा कमी धरलेले पाच, दहा टक्के उत्पन्न जास्तच आले, तर प्रo्नच मिटला. अशा तर्‍हेने अक्कलखाती जमा होणार्‍या पैशाची सोय प्रत्येकाने करावयाची असते. कितीही काळजी घेतली तरी आयुष्याच्या 70-80 वर्षांच्या काळात काही बेगमी गमवावी लागते. ही बेगमी करावयाची असल्यास काही काळजी घेता येईल.

  कोणती काळजी घ्यावी

  ज्यादा व्याजाच्या हव्यासामागे लागू नका, ज्याचा व्याज देणार्‍याला आपण दिलेले पैसे अजून जास्त व्याजाने गुंतवावे लागतात किंवा कमवावे लागते ते शक्य आहे का? याचा विचार करा! नाही तर सुरुवातीला काही दिवस व्याज मिळते नंतर मुद्दलच गायब होते. उदा. सीआरबी प्रकरण.

  ज्या बँकेत किंवा पतपेढीमध्ये आपण पैसे ठेवतो तेथे आपली ये-जा असली पाहिजे. प्रत्येक बँकेत एक बॉडी लँग्वेज असते, त्यावरून आपल्याला अंदाज येतो. ज्या बँकेत आपण ठेव ठेवतो त्या बँकेने डिपॉझिट रिस्क इन्शुरन्स भरलेला पाहिजे.

  जसजसे वय वाढत जाते, तसे जोखमीचे व्यवहार कमी करावे. फार लांब मुदतीची गुंतवणूक करू नये. गुंतवणूक विखरून करावी diversification is the main principle of investment . प्रवासाला जातानादेखील जवळ असलेले पैसे विखरून ठेवावे.

  खर्चिक आजाराची mediclaim सारखी पॉलिसी घेऊन करता येते. मुद्दलाच्या व्याजावर दरिद्री जीवन जगण्यापेक्षा व्याजाबरोबर मुद्दलाच्या खर्चाचे सुद्धा नियोजन करता येईल का ते पाहा.

  मुलाच्या प्रेमाखातर आपल्या आयुष्याची पुंजी त्यांच्या हवाली करून आपले जीवन दरिद्री करू नका, अशी कितीही काळजी घेतली ‘अक्कलखात्यात’ काही पैसे पडणारच, याचे भान ठेवा.
Trending