आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात विक्रीचा धडाका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाची पुन्हा घसरण, सिरियाच्या क्षितिजावर जमा झालेले युद्धाचे ढग आणि भारतीय अर्थव्यवस्थेबाबत विविध पतमानांकन संस्थांनी उभे केलेले प्रश्नचिन्ह यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात विक्रीचा धडाका लावला. परिणामी सेन्सेक्स 651.47 अंकांनी कोसळून 18,234.66 वर आला. निफ्टी 209.30 अंकांच्या घटीसह 5341.45 वर स्थिरावला. युद्धाच्या शक्यतेने डॉलरला आलेल्या मागणीमुळे रुपयाने पुन्हा 67.63 अशी पातळी गाठली. सराफा बाजाराला आलेल्या तेजीच्या चकाकीने सोने तोळ्यामागे 440 रुपयांनी वाढून 31,540 झाले, तर चांदी किलोमागे 1080 रुपयांच्या वाढीसह 55,430 वर पोहोचली.

दलाल स्ट्रीटवर घबराट
एकीकडे रुपयाचा धक्का सहन करतानाच सिरियावरील लष्करी हल्ल्याचा धोका वाढल्याचा ताण बाजाराला सहन झाला नाही. त्यामुळे बाजारात झालेल्या सपाटून विक्रीत सेन्सेक्स 651 अंकांनी आपटला. सिरियावर धाडलेली दोन क्षेपणास्त्रे भूमध्य समुद्रात दिसली असल्याचा दावा रशियातील प्रसारमाध्यमांनी केला. सिरियावर हल्ला होण्याच्या भीतीने अगोदरच चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांना रशियातल्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या या दाव्यामुळे गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळू सरकली.

त्यातच स्टॅँडर्ड अँड चार्टर्ड या संस्थेने इंडोनेशियाच्या तुलनेत भारताचेच पतमानांकन घटण्याची जास्त शक्यता असल्याचे संकेत दिल्यामुळे तर बाजाराच्या तोंडचे पाणी पळाले. बाजारात तुफान विक्रीचा मारा सुरू झाला.


रुपया घसरून 67.63
सिरियावरील संभाव्य लष्करी कारवाईमुळे तेलाचा भडका उडण्याच्या शक्यतेने रुपया पुन्हा घसरला. डॉलरच्या तुलनेत मंगळवारी रुपयाने 163 पैसे गमावत 67.63 ही पातळी गाठली. लवकरच रुपया 72 पातळी गाठेल, असा अंदाज एचएसबीसी ग्लोबल रिसर्च, नोमुरा, गोल्डमन सॅक्स या पतमानांकन संस्थांनी व्यक्त केला.


बाजार का घसरला
0 सिरियावर अमेरिकेने क्षेपणास्त्र टाकल्याचे वृत्त रशियाच्या माध्यमांनी दिले.
0 स्टँडर्ड अँड चार्टर्डने इंडोनेशियाच्या तुलनेत भारताचे पतमानांकन कमी राहण्याचा व्यक्त केलेला अंदाज.
0 जेपी मॉर्गनपाठोपाठ एचएसबीसी ग्लोबल रिसर्च, नोमुरा, गोल्डमन सॅक्स यांनी देशाचा आर्थिक विकास दर चार टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला.


सोने-चांदी तेजीत
जागतिक घडामोडी आणि मोठी मागणी यांच्या जोरावर दोन्ही मौल्यवान धातूत तेजी दिसून आली. राजधानीतील सराफा बाजारात तेजीच्या चकाकीने सोने तोळ्यामागे 440 रुपयांनी वाढून 31,540 झाले, तर चांदी किलोमागे 1080 रुपयांच्या वाढीसह 55,430 वर पोहोचली. मागील चार सत्रांत सोने तोळ्यामागे 3,885 रुपयांनी घसरले होते.

गुंतवणूकदारांनी काय करावे
अफवांवर विश्वास न ठेवता योग्य पद्धतीने खरेदी विक्री सुरू ठेवावी. शॉर्ट टर्मसाठी स्टॉप लॉस लावावा. कच्चे तेल आणि डॉलर वधारल्याने कोणत्या कंपन्यांना फायदा होईल हे हेरून खरेदी करावी. बाजाराच्या प्रत्येक घसरणीला खरेदी आणि तेजीला विक्री हे धोरण ठेवावे. चांगला अभ्यास करून खरेदी-विक्रीचा निर्णय घ्यावा. विश्वनाथ बोदाडे, वरिष्ठ व्यवस्थापक, आनंद राठी ब्रोकर्स