आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदार मालामाल,रुपयाकडून डॉलरची धुलाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चीन आणि अमेरिकेतून मिळणारे सकारात्मक संकेत, रुपयाकडून डॉलरची धुलाई यामुळे सोमवारी शेअर बाजारात खरेदीला उधाण आले. रुपयाने 70 पैशांची कमाई केली. अमेरिका फेडरल रिझर्व्हकडून आर्थिक मदतीचे पॅकेज चालू राहण्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदार खुश झाले. चीनमधील आर्थिक सुधारणांबाबत सकारात्मक सूर आळवत सेन्सेक्सने 451 अंकांची उसळी मारली. शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक लाख कोटी रुपयांची भर पडली.
मोहर्रममुळे शुक्रवारी बंद असलेल्या बाजाराने सोमवारी तेजीने प्रारंभ केला. रुपयातील तेजी, अमेरिका फेडरल रिझर्व्हने आर्थिक मदत सुरूच ठेवण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी खरेदीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्स 451.32 अंकांच्या वाढीसह 20,850.74 वर पोहोचला. निफ्टीने 132.85 अंकांची कमाई करत 6189 पर्यंत मजल मारली. भांडवली वस्तू आणि बँकांच्या समभागांना मोठी मागणी आली.एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या दिग्गज समभागातील तेजीने सेन्सेक्सच्या वाढीला बळ मिळाले. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 26 समभाग चमकले.
जगभर तेजी : चीन आणि अमेरिकेतील वृत्तांमुळे जगभरातील प्रमुख शेअर बाजारात तेजी दिसून आली. आशियातील हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 2.73 टक्के तर चीनचा शांघाय बाजार निर्देशांत 2.87 टक्क्यांनी वधारला. युरोपातील फ्रान्सचा कॅक निर्देशांक चांगला वधारला. तर इंग्लंड आणि र्जमनीच्या निर्देशांकात किरकोळ घसरण दिसून आली.
गुंतवणूकदाराच्या संपत्तीत भर
सोमवारी सेन्सेक्सने 451 अंकांची उसळी मारल्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले. या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एक लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. चीनने आर्थिक सुधारणा करण्याचे ठरवले आहे. तर अमेरिकेने रोखे खरेदी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाजार तेजीने वधारला. तेजीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती 67,94,300 कोटींवरून 1,05,802 कोटींवर पोहोचली. बाजारातील तेजीत 1403 समभाग वधारले, 1057 समभाग आपटले तर 126 समभाग स्थिर राहिले.
तेजीची कारणे
0 रोखे खरेदी कार्यक्रम सुरू ठेवण्याचे अमेरिकेचे संकेत
0 आर्थिक सुधारणा राबवण्याचे चीनकडून संकेत
0 विदेशी वित्तीय संस्थांकडून जोरदार खरेदी
0 डॉलरच्या तुलनेत रुपयातील तेजी
रुपयाला नवी गती, 62.41 वर
निर्यातदारांनी केलेल्या डॉलर विक्रीमुळे सोमवारी रुपयाचे मूल्य चांगलेच वधारले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 70 पैशांची कमाई करत 62.41 पर्यंत मजल मारली. सलग तिसर्‍या सत्रांत रुपयाने तेजी नोंदवली. रिझर्व्ह बँकेने रोखे खरेदीसाठी 8000 कोटी रुपये अर्थव्यवस्थेत टाकण्याची योजना आखली आहे. त्याचाही फायदा रुपयाच्या तेजीला झाला.
तेजीचे मानकरी
एचडीएफसी (4.15 टक्के वाढ), लार्सन अँड टुब्रो (3.9 टक्के), आयटीसी (3.61 टक्के), हिंदाल्को इंडस्ट्रीज (3.34 टक्के)
अनपेक्षित तेजी
भारतीय बाजारात सोमवारी अनपेक्षित तेजी आली. किरकोळ गुंतवणूकदारांशिवाय विदेशी संस्थांनी भरभरून खरेदी केली. जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग
गुंतवणूकदारांनी पुढे काय करावे ?
0 सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक सर्वोच्च् पातळीच्या नजीक आहेत, या स्थितीत गुंतवणूकदारांनी नेमके काय करावे याबाबत आनंद राठी ब्रोकर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ बोदाडे यांनी दिलेल्या टिप्स :
0 राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर बारकाईने नजर ठेवावी. घडामोडीनुसार निर्णय घ्यावा
0 कमी पातळीत खरेदी केलेले समभाग चांगल्या पातळीवर असतील तर नफा पदरात पाडून घ्यावा.
0 बाजाराच्या फार प्रेमात न पडता, मोह टाळून केवळ नफ्यावर प्रेम करा.
0 कोणी सांगते आहे म्हणून एखादा दर्जाहीन समभाग खरेदी करू नका, खरेदी करायची असेल तर ब्ल्यू चिपची करा.
0 बाजार घसरल्यावर खरेदी आणि तेजीला विक्री हा बाय ऑन डीपचा नियम लक्षात ठेवा
0 पैसा तुमचा आहे, त्याबाबत निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.