मुंबई - केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर बाजारातील तेजीला उधाण आले आहे. मेनंतर आलेल्या या तेजीने अनेक गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत. आश्चर्य म्हणजे या गुंतवणूकदारांनी शेअर्स किंवा सोने खरेदीऐवजी जमिनी, घरे, फ्लॅट खरेदीत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले आहे. प्रॉपर्टी इंडियाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे.
या सर्वेक्षणानुसार, यात सहभाग घेणार्या 67 टक्के गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे पसंत केले, तर 18 टक्के सहभागींचा कल शेअर्सकडे आणि 15 टक्क्यांचा ओढा साने खरेदीकडे राहिला. प्रॉपर्टी इंडियाने यासाठी 2583 जणांची मते जाणून घेतली. यापैकी 30 टक्के लोक 46 व त्यापेक्षा जास्त वयाचे तर 40 टक्के लोक 25 ते 35 या वयोगटातील होते.
प्रॉपर्टी इंडियाच्या मते, केंद्रात नव्याने सत्तेत आलेल्या भाजपप्रणीत सरकारमुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम दिसून आला. यामुळे गुंतवणूक क्षेत्रातील मरगळ दूर झाली आहे. सर्व साधनांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला असून रिअल इस्टेट क्षेत्राची त्यात आघाडी आहे. मोदी सरकारच्या पुढील आठवड्यात सादर होणार्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अनुकूल तरतुदी असतील, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. त्याशिवाय पायाभूत क्षेत्राला प्राधान्य मिळणार असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते.