आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयपीओ’साठी आता कडक नियम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भांडवल बाजारात कंपन्यांच्या शेअर बाजार नोंदणीच्या वेळी समभागांच्या किमतीत होणा-या अतिरिक्त चढ- उताराला आळा घालण्याच्या दृष्टीने समभागांची पुनर्नोंदणी आणि प्राथमिक समभाग विक्रीवर (आयपीओ) अतिरिक्त नियंत्रण आणण्यासाठी बाजार नियंत्रक ‘सेबी’ यांनी कडक नियमावली जाहीर केली आहे.
समभाग नोंदणीच्या पहिल्या दिवशी साधारणपणे समभागांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली होत असल्याचे बाजार नियंत्रकांना आढळून आले आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नेहमीच्या कामकाज सत्रामध्ये बाजारात पुन्हा नोंदणी होणारे समभाग तसेच प्राथमिक समभाग विक्रीच्या व्यवहारांवर आणखी नियंत्रण आणण्याचा निर्णय भांडवल बाजार नियंत्रकांनी घेतला आहे. या नियंत्रणाचा पहिली पायरी म्हणून शेअर बाजार नोंदणीच्या पहिल्या दिवशी होणा-या नेहमीच्या व्यवहारांमध्ये दरपट्टा लावण्याबरोबरच पुन्हा नोंदणी होणारे समभाग आणि आयपीओला सुनियोजित किंमत मिळवून देण्यासाठी कॉल आॅक्शन यंत्रणा लागू करण्याचा निर्णय बाजार नियंत्रकांनी घेतला आहे. सध्या कॉल आॅक्शन प्रणालीही केवळ सेन्सेक्स आणि निफ्टी समभागांनाच लागू आहे. बाजार नियंत्रकांनी 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री मूल्य असलेल्या सर्व समभागांना 5 टक्के दरपट्टा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जर 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री मूल्य असलेल्या सर्व नवीन नोंदणी असलेल्या समभागांवर 20 टक्के दरपट्टा लागू करण्याचा निर्णयही बाजार नियंत्रकांनी घेतला आहे. त्याशिवाय या समभागांचा पहिल्या दहा दिवसांसाठी ‘ट्रेड फोर ट्रेड’मध्ये (टीएफटी) समावेश करण्यात येणार आहे. या सर्व नवीन तरतुदींची अंमलबजावणी चार आठवड्यांत होणार असल्याचे ‘सेबी’ने म्हटले आहे.

नियमांचे उल्लंघन : 17 कंपन्यांना दंड
प्लॅटिनम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या समभागांमध्ये बोगस व्यवहारापासून ते अधिग्रहण केलेल्या समभागांची माहिती जाहीर न करणे अशा विविध आरोपांसाठी भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ने 17 कंपन्यांना 24 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका स्वतंत्र आदेशामध्ये कंपनीच्या समभागांचे अधिग्रहण केल्याची माहिती शेअर बाजाराला जाहीर न केल्याबद्दल ‘सेबी’ने प्लॅटिनम कॉर्पोरेशनचे प्रवर्तक आणि संचालक प्रतीक शाह आणि अन्य 14 जणांवर संयुक्तपणे 20 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. गैरव्यवहार केल्याप्रकरणी शंकरलाल एम. पटेल आणि लक्ष्य सिक्युरिटीज अ‍ॅँड क्रेडिट होल्डिंग्ज लि. यांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या समभागांत दिसला मोठा चढ-उतार
> बिर्ला पॅसिफिक मेडस्पा, पीजी इलेक्ट्रोप्लास्ट, शेखावत पॉलियार्न, एम. अँड बी. स्वीच गिअर. विशेष म्हणजे लहान कंपन्यांच्या आयपीओ किमतींमध्ये जास्त चढ-उतार झाला आहे.
> गेल्या वर्षात साधारणपणे बाजारात आलेल्या 38 ‘आयपीओ’च्या समभाग किमतींत सरासरी 65 टक्के चढ-उतार दिसून आला.