आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या खरेदीला योग्य वेळ आहे का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 ते 30 टक्के घसरण, सोने अजून स्वस्त होईल काय
सध्या सोन्याच्या भावात अचानक ऐतिहासिक घसरण झाली आणि सर्वत्र चर्चेला उधाण आले. अर्थक्षेत्रातील तज्ज्ञांच्या दृष्टीने अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याच्या भावात तर, चढउतार नेहमीच होत असते, पण अचानक 25 ते 30 टक्के घसरण ही बाब मात्र निश्चितच सामान्य गुंतवणूकदार ग्राहक आणि सोन्याकडे भारतीय भावनात्मक पद्धतीने पाहण्याच्या परंपरागत मानसिकतेला धक्का देणारी ठरली आणि आता एक नवीनच प्रश्न समोर येत आहे. तो म्हणजे सोन्याच्या खरेदीला ही योग्य वेळ आहे का ? सोने आणखीन स्वस्त होईल काय ? सोने नेमके किती स्वस्त होऊ शकेल ? हे आणि असे अनेक प्रश्न मनात असताना नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही एक वर्ष सोने खरेदीचा मोह टाळावा, असे विधान केले.


सोने भाववाढीत तेजी म्हणजे सूज व कृत्रिम फुगवटा
गुंतवणुकीसाठी अशी अस्थिर वातावरणात आपण सावध पवित्रा घेणे योग्य ठरेल. मुळात गेली दोन वर्षे सोन्याच्या भाव वाढत असताना कोणी असा विचार केला नाही की अचानक सोन्याच्या भावात एवढी तेजी का? ही खरी तेजी होती की सूज? एकूणच काय तर कमोडिटी मार्केटवर चर्चा होत असताना त्या कमोडिटीच्या एकूण उलाढालीचा विचार, उत्पादनचा विचार आणि जागतिक घडामोडींमुळे डॉलरचा रूपयावर होणारा परिणाम याबाबत अभयासपूर्ण विचार करण्यापेक्षा भावनात्मक अंदाजालाच अवाजवी महत्त्व दिल्यामुळे नेमके सोन्याचे भाव का घसरले या बाबींकडे दुर्लक्ष होऊन फक्त बाजारात सनसनाटी निर्माण झाली.


अर्थव्यवस्थेला न पेलणारी सोन्याची आयात
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण भारतीय अर्थ व्यवस्थेला न पेलणारी सोन्याची आयात आणि सोन्याच्या आयातीवर बंधन घालणारी कररचना याबाबी देखील दुर्लक्ष करण्यासारख्या नाही, परंतु सामान्य गुंतवणुकीद्वारे या बाबीपासून अनभिज्ञ असतो, म्हणून असे प्रश्न निर्माण होतात. कमोडिटी मार्केटचा अभ्यास म्हणून विचार केला तर अजूनही सोन्याची घसरण पूर्णपणे संपली आहे असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. एक - दोन वर्षाच्या गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करा असा सल्ला नाही देता येतो. यामुळे गुंतवणुकीवर फायदा हा दृष्टिकोन ठेवून सध्यातरी सोन्यात गुंतवणूक न करणेच हितावह ठरणार.


सोन्यापेक्षा कमोडिटीत करा गुंतवणूक
याचा अर्थ सध्या कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास वाव नाही का ? तर तसे अजिबात नसून प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा mcx, ncdex मार्केटमध्ये कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला फायदा कमवता येऊ शकतो, परंतु याकरिता कमोडिटी मार्केटचा अभ्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे धोरण याचा अवलंब करूनच कमोडिटी मार्केटचा चांगला लाभ उठवता येऊ शकतो. एवढेच काय आपल्या गुंतवणुकीकडून आपल्याला किती परतावा अपेक्षित आहे. तो बँकेतील दीर्घकालीन ठेवीपेक्षा हमखास जास कसा मिळवता येईल, याबाबत एक निश्चित धोरण ठरवून कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास नोकरदर वर्ग, पेन्शनर, गृहिणी यांनादेखील प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक न करता सोन्यातील गुंतवणुकीपेक्षा चांगला परतावा मिळण्यासाठी कमोडिटी ट्रेडिंग हा सक्षम पर्याय ठरू शकतो.

(लेखक कमोडिटी क्षेत्रातील अभ्यासक व तांत्रिक विश्लेषक आहेत.)