आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IT Equity Recover Market, Sensex Come Down 79 Numbers

आयटी समभागांनी बाजाराला सावरले, सेन्सेक्स 79 अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महागाई दराचा वाढता आलेख आणि औद्योगिक उत्पादनाचा घसरता आलेख यामुळे सोमवारी बाजारात चढ-उताराचे हिंदोळे दिसून आले. अत्यंत अस्थिर वातावरणात सत्राअखेर सेन्सेक्स 78.95 अंकांच्या वाढीसह 20,607.54 वर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी बाजाराला सावरले. निफ्टीने 16.5 अंकांच्या कमाईसह 6112.70 हा पातळी गाठली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या निकालावरही बाजाराची नजर होती.
टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागातील तेजीने सेन्सेक्सला वाढीचे बळ दिले. बाजारातील 13 क्षेत्रीय निर्देशांकात माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाने आघाडी घेतली. सप्टेंबरमध्ये महागाईने पुन्हा एकदा विक्राळ रूप धारण केल्याने आणि औद्योगिक उत्पादनात घट झाल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी सुरूच ठेवल्याने बाजाराला दिलासा मिळाला. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1010.45 कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 13 समभाग वधारले.


चीनच्या निर्यातीत अनपेक्षित घट आणि अमेरिकेतील शटडाऊनचा पेच यामुळे आशियातील प्रमुख बाजारांत घसरण दिसून आली. सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवानचे बाजार घसरणीसह बंद झाले. जपान आणि दक्षिण कोरियातील बाजार बंद होते. युरोपातील बाजारात संमिश्र कल होता.


सणांमुळे सोन्याला झळाळी
देशातील सणांचा हंगाम आणि त्याला जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेतांची लाभलेली साथ यामुळे सोने पुन्हा तेजीने झळाळले. सोमवारी राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 575 रुपयांनी वाढून 30,775 झाले. चांदी किलोमागे 680 रुपयांनी चकाकून 47,570 झाली.


तेजीचे शिलेदार : टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक.
घसरलेले समभाग : हिंदाल्को, टाटा स्टील, सिप्ला, गेल इंडिया, भेल.
महागाईचा फटका : सप्टेंबरमध्ये महागाईत वाढ झाली असून ती रिझर्व्ह बँकेच्या समाधान पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे बाजारातील तेजीवर परिणाम झाला. : निधी सारस्वत, रिसर्च अ‍ॅनालिस्ट, बोनान्झा पोर्टफोलिओ.