आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra P.S.Solanki's Artical On Pension Investment

पेन्शनसाठी गुंतवणुकीत होणा-या चुका टाळा, जीवनशैली राखा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्तीनंतरचा काळ सुखात जाण्यासाठी पुरेसा पैसा गाठीशी असावा, असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, निवृत्तीसाठी बराच काळ असेल तर आपण याकडे फारसे लक्ष देत नाही. कारण, निवृत्तीपर्यंत पोहोचतेवेळी ब-याच जबाबदा-या पार झालेल्या असतात. दुसरे असे की, निवृत्तीची वेळ पुढे ढकलता येईल, असे आपण ब-याच वेळा गृहीत धरतो. याच विचारातून काही चुकाही घडतात. वेळीच या चुका टाळल्या नाहीत तर निवृत्तीनंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. पेन्शनसाठी रक्कम जमा करतेवेळी या पाच चुका टाळायला हव्यात...
1- कामगिरीनुसार गुंतवणूक करा : गुंतवणुकीच्या कोणत्याही साधनाचा विचार करताना त्याची मागील कामगिरी लक्षात घ्यावी. मात्र, मागील कामगिरी भविष्यात तशीच राहील, असे मानून चालू नका. काही जण मागील कामगिरीच्या आधारावर योग्य अ‍ॅसेट श्रेणी निवडण्यात चूक करतात. दुस-यांदाही पहिल्याप्रमाणेच परतावा मिळेल, अशी ते अपेक्षा करतात. अनेकदा आपण गुंतवणुकीत वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) राखत नाही. अशा चुका टाळा.
2- गुंतवणुकीसाठीच्या खर्चाचा विचार न करणे: प्रत्येक गुंतवणुकीत, विशेषत: मार्केटशी संबंधित गुंतवणूक साधनात त्याच्या खर्चाचा समावेश असतो. गुंतवणुकीच्या साधनानुसार आणि श्रेणीनुसार हा खर्च वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या म्युच्युअल फंडाची श्रेणी एकच असते, मात्र कंपन्या वेगवेगळ्या असतात. कंपनीनिहाय एक्स्पेन्स रेशो वेगवेगळा असू शकतो. जेव्हा दीर्घकाळाचे लक्ष्य असते तेव्हा गुंतवणुकीचा खर्च परताव्यावर परिणाम करू शकतो. गुंतवणुकीत ब्रोकरेजसारखे खर्चही लक्षात घ्यावे लागतात. त्यामुळे गुंतवणुकीच्या वेळीच या खर्चाचे विश्लेषण करावे.
3- जोखीम टाळा : काही जण निवृत्तीची वेळ जवळ येताच आपली सर्व गुंतवणूक सुरक्षित साधनांत टाकतात. मग परतावा कमी मिळतो आहे याकडे दुर्लक्ष होते. मात्र, जाखीम न घेणे हीपण एक प्रकारची जोखीमच आहे. उदाहरणार्थ, निवृत्त होतानाही वाढते वय ही एक प्रकारची जोखीमच आहे. जेव्हा आपली गुंतवणूक जास्त परतावा देत नसेल तर दीर्घकाळासाठी ती नियमित उत्पन्नाच्या दृष्टीने कमी पडणार आहे, हे लक्षात घ्या. योग्य परताव्यासाठी महागाई, कर यांचाही विचार करावा.
4- सखोल विचारांचा अभाव : निवृत्तीनंतरच्या काळासाठी योजना बनवताना अनेक मुद्दे असे असतात की जे आपल्या आर्थिक स्थितीशी निगडित असतात. समजा आपल्यावर पर्सनल कर्ज किंवा देणे असेल तर ते न फेडता गुंतवणुकीची योजना यशस्वी होऊ शकत नाही. अनेकदा कर्जाचा बोजा वाढल्याने जमा केलेली रक्कम त्यासाठी खर्च होऊ शकते. त्यामुळे योजना तयार करताना सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक ठरते.
5- हिस्सा न वाढवणे : केवळ फिक्स्ड बचतीतून मोठी रक्कम जमवणे अवघड आहे. वयाबरोबरच आपले उत्पन्नही वाढत असते. जीवनशैली उंचावली तर निवृत्तीनंतर ती तशी राखणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत गुंतवणुकीच्या रकमेत वाढ केली नाही, हिस्सा वाढवला नाही तर तुमचे लक्ष्य पूर्ण होणार नाही. वेळेनुसार गुंतवणुकीच्या रकमेत वाढ करत राहणे हा त्यावरील उत्तम उपाय आहे.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.