आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सणांवर महागाईचे विरजण;कांदा, भाजीपाला, कडधान्ये कडाडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कडाडलेल्या भाजीपाल्याबरोबरच आता कांद्यानेही रडवण्यास सुरुवात केल्याने महागाईने पाच महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. या दोन जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या किमतीमुळे जुलै महिन्यात महागाई 5.79 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. एकीकडे रुपयाचे युद्ध निकराने लढत असलेल्या केंद्र सरकारला आता महागाईच्या नव्या युद्धाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

जून महिन्यात 4.86 टक्क्यांपर्यंत घसरलेला घाऊक किमतीवर आधारित महागाईचा दर जुलै2012 मध्ये 7.52 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. यंदाच्या फेब्रुवारीतील 7.28 टक्क्यांनंतर जवळपास पाच महिन्यांनंतर महागाईचा पारा पुन्हा चढला आहे. विशेष म्हणजे तो फेब्रुवारीपेक्षाही जास्त वर गेला असून रिझर्व्ह बँकेच्या 4 ते 5 टक्क्यांच्या स्वीकारार्ह पातळीपेक्षाही जास्त आहे. कांदा, कडधान्ये आणि तांदूळ या तीन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे खाद्यान्न विभागातील महागाईच्या दराने 11.91 टक्के अशी दोनअंकी वाढ नोंदवली आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या यादीत 14.34 टक्के वाटा असलेल्या खाद्यान्नाच्या किमती जून महिन्यात 9.74 टक्क्यांवर होत्या. खाद्यान्न गटातील महागाईने सलग तिसर्‍या महिन्यात वाढ नोंदवली आहे.

वार्षिक आधारावर कांद्याच्या किमतीत जुलैमध्ये जवळपास दुपटीने म्हणजे 145 टक्क्यांनी वाढ झाली असून भाजीपाल्याच्या किमतीत 14.47 टक्क्यांवरून (जून) 46.59 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे तेल आयात महाग झाले आहे. याचा परिणाम म्हणजे इंधन आणि ऊर्जा महागाईमध्ये 11.31 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

स्वस्त कर्ज पुन्हा लांबणार
जुलैमध्ये सलग दुसर्‍या महिन्यात महागाईचा पारा कायम राहिल्याने उद्योग क्षेत्रातील विविध संस्थांनी पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी व्याजदर कमी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते; परंतु या महागाईमुळे व्याजदर कपातीची आशा पुन्हा धूसर होण्याची भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली. उत्पादित गटातील महागाईचे प्रमाणदेखील वाढून ते 2.75 टक्क्यांवरून (जून) टक्क्यांवरून 2.81 टक्क्यांवर (जुलै) गेले आहे.

रुपयाचा परिणाम
डॉलरच्या तुलनेत सुरू असलेली रुपयाची घसरण हेच महागाई वाढण्यासाठी मुख्य कारण आहे. पुरवठा साखळीमध्ये सुधारणा झाल्यास अन्नधान्याची महागाई कमी होऊ शकेल; परंतु रुपयाची स्थिरावण्याकडे वाटचाल सुरू असल्याने महागाई कायम राहील, असे आपणास वाटत नाही. - माँटेकसिंग अहलुवालिया, उपाध्यक्ष, नियोजन आयोग.

प्रयत्न हवेत
महागाईचा सध्याचा कल लक्षात घेता कृषी वस्तूंच्या पुरवठा साखळीतील अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची गरज आहे. उत्पादनात वाढ करतानाच सक्षम वितरण प्रणालीचा अवलंब केल्यास सध्याच्या चढ्या खाद्यान्नाच्या महागाईवर मात करण्यास मदत होऊ शकेल. - दिदार सिंग, महासचिव, फिक्की.

पुरवठा वाढवण्याची गरज
नाणेनिधी धोरण आढाव्यामध्ये रिझर्व्ह बँकेने अन्नधान्याची महागाई हव्या त्या प्रमाणात कमी झाली नसल्याचे मत व्यक्त केले होते. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीदेखील महागाईचे प्रमाण कमी करण्यासाठी पुरवठा साखळीत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली.