Home »Business »Personal Finance» Jumping On Tax Saving Fund

टॅक्स सेव्हिंग फंडांवर उड्या

प्रतिनिधी | Feb 14, 2013, 00:18 AM IST

  • टॅक्स सेव्हिंग फंडांवर उड्या

मुंबई - कर लाभ मिळवून देणा-या समभागांशी निगडित बचत योजना अर्थात ‘इक्विटी लिंक सेव्हिंग्ज स्किम’ (ईएलएसएस) योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. या फंडातील गुंतवणूकदारांची मालमत्ता दोन वर्षांचा उच्चांक गाठत 25 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. एप्रिल 2011 पासूनचा हा उच्चांक असल्याचे मानले जात आहे.

म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणा-या ‘अ‍ॅम्फी’ संस्थेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ईएलएसएस किंवा कर बचत फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता वाढून ती यंदाच्या जानेवारीअखेर 25,069 कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात म्युच्युअल फंडांच्या ‘ईएलएसएस’ या गटाने 25 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर पहिल्यांदाच या फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ झाली आहे.

जानेवारी 2003 मध्ये ‘ईएलएसएस’च्या व्यवस्थापनाखाली केवळ 1,410 कोटी रुपयांची मालमत्ता होती, परंतु गेल्या दहा वर्षांत या मालमत्तेत तब्बल 18 पटीने वाढ झाली असल्याचे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’ कडे (अ‍ॅम्फी) उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.

साधारणपणे डिसेंबर ते मार्च या कालावधीत ‘ईएलएसएस फंडां’मध्ये निधीचा ओघ येण्याचे प्रमाण जास्त असते. आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर कर लाभ पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीने गुंतवणूकदार साधारणपणे अशा प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे जास्त पसंत करतात. एसबीआय म्युच्युअल फंडाने मार्च 1993 मध्ये पहिला ईएलएसएस फंड आणल्यानंतर एचडीएफसी, टाटा, बिर्ला सन लाइफ, आयसीआयसीआय, रिलायन्स आणि यूटीआय या सर्व बड्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी स्वत:च्या योजना
बाजारात आणल्या.

ईएलएसएस फंडाचा फायदा
पात्र गुंतवणूकदारांकडून या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक झाल्यास ती प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 क अंतर्गत कर वजावटीसाठी पात्र ठरते. या फंडात एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्या व्यक्तीला आपल्या एकूण कर जबाबदा-यांच्या तुलनेत 30 हजार 900 रुपयांची बचत करता येऊ शकते.

सिप, लॉक इनमुळे गुंतवणूक सुरक्षा
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सच्या (एसआयपी) माध्यमातून या योजनेत येणारा निधीचा लक्षणीय ओघ अणि तीन वर्षांच्या ‘लॉक इन’ कालावधीचे असलेले बंधन यामुळे पारंपरिक इक्विटी फंडांच्या तुलनेत टॅक्स सेव्हिंग फंडांमधून रक्कम काढून घेण्याचे प्रमाण कमी असते. हे लक्षात घेतले तर चालू आर्थिक वर्षात इक्विटी फंडांमधून 13 हजार कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला असून ईएलएसएस फंडांतून केवळ 1,875 कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला आहे. बड्या फंड कंपन्यांनी स्वत:च्या योजना बाजारात आणल्या.

Next Article

Recommended