आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Just Card Swap, Withdraw Money, New Option For The ATM

पीओएसद्वारा कार्ड स्वॅप करा-पैसे काढा; एटीएमला नवा पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्टेट बँक ऑफ इंडियाने पीओएस (पाँइट्स ऑफ सेल) या नव्या प्रणालीचा वापर मराठवाड्यात पहिल्यांदा औरंगाबादमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून एटीएम आणि बँकेशिवाय तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला खर्च येणार आहे फक्त साडेसात रुपये. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात वीस ठिकाणी तो राबवण्यात येणार आहे.


आपल्या खात्यामधील पैसे काढण्यासाठी खातेदार बँक एटीएमचा वापर करतो. अनेक वेळा मॉल तसेच दुकानात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसेच कार्ड स्वॅप करून ती खरेदी केली जाते. मात्र, ब-याचदा जवळपास एटीएम नाही आणि बँकही नाही अशी स्थिती असते. अशा वेळी पीओएसमुळे ग्राहकांची अडचण दूर होते. एस.बी.आय.ने पीओएस ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये एखाद्या दुकानात ही मशीन लावल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला कार्ड स्वॅप केल्यानंतर त्यामधून पैसे काढता येणार आहेत. यामध्ये शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. ज्या दुकानात अथवा व्यक्तीकडे हे मशीन ठेवण्यात येईल त्या व्यक्तीला यामागे कमिशन मिळणार आहे.


पाच ठिकाणी होणार प्रयोग :
या प्रणालीचा प्रयोगिक तत्त्वावर प्रयोग पेटपूजा, गुरुमाऊली मेडिकल, साई फुटवेअर, अ‍ॅट अवे हॉटेल, पुष्कराज इलेक्ट्रॉनिक्स या पाच ठिकाणी करण्यात येणार आहे. अनेकदा घराबाहेर पडल्यानंतर एटीएम, तसेच बँक जवळ नसताना पैशाची आवश्यकता असल्यास या सुविधेचा वापर करता येतो. एखाद्या मेडिकलवर गेल्यानंतर आपल्याकडे पैसे नसतील आणि त्या ठिकाणी या मशीनची सुविधा असेल तर त्यामधून तुम्हाला पैसे काढता येऊ शकतात. यामध्ये एकदा पैसे काढल्यानंतर तुम्हाला साडेसात रुपयांचा खर्च येणार आहे.यामध्ये पाच रुपये ज्या व्यक्तीकडे हे मशीन बसवले आहे त्याला मिळणार आहेत, तर अडीच रुपये बँकेला मिळणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून ज्याच्याकडे ही सुविधा सुरू झाली त्यालादेखील याचा फायदा होणार आहे.त्यासाठी त्या व्यक्तीचे बँकेत अकाउंट असणे आणि लँडलाइन फोनची सुविधा असणे आवश्यक आहे.


ग्राहकांना फायदा
या योजनेमुळे ग्राहकांना फायदा मिळणार आहे. दूर ठिकाणच्या एटीएमवर जाण्यासाठी होणारा इंधनाचा खर्च वाचणार आहे. शिवाय बँकेत जाण्याचे श्रम वाचतील. एटीएमला नवा पर्यायदेखील यामुळे मिळणार आहे. ग्राहकांच्या वेळेची बचतदेखील होणार आहे.
शिवचरण फोकमारे, उपमहाप्रबंधक, एस.बी.आय.


चांगला पर्याय
आतापर्यंत कस्टमर सर्व्हिस ही फक्त एटीएम डेबिट, क्रेडिटपर्यंत मर्यादित होती. मात्र, या नव्या तंत्रामुळे जास्तीत जास्त ग्राहकांची सोय होणार आहे. अनेकांना रोजगार मिळू शकतो. जवळ एटीएम नसल्यास हा चांगला पर्याय ठरू शकतो. अरुण जोशी, जनरल सेक्रेटरी, एस.बी.आय. स्टाफ युनियन, औरंगाबाद.