आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल ऑटो उद्योगातील आगळे व्यक्तिमत्त्व : कार्ल स्लिम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा बँकॉक येथे एका हॉटेलच्या गॅलरीतून पडून संशयितरीत्या मृत्यू झाला. कंपनीच्या एका बैठकीनिमित्त ते येथे आले होते. जागतिक वाहन उद्योगातील एक उगवता तारा म्हणून कार्ल स्लिम यांची ओळख होती. ते 2012 मध्ये टाटा मोटर्सचे एमडी बनले. नॅनोला मिळणारा थंड प्रतिसाद आणि त्याच्या विक्रीतील घट आणि वाढती स्पर्धा यातून टाटा मोटर्सच्या वाहनांची विक्री वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
जनरल मोटर्सच्या बंगळुरू येथील टेक्निकल सेंटरमध्ये मी कार्ल यांना प्रथम भेटलो होतो. तेव्हा त्यांनी एका वेगळ्या कोनातून मुलाखत घेण्याचे सुचवले होते. त्यांची ही बाब मी मान्य केली होती. त्यानंतर त्यांनी हसतहसत त्याचे कारणही सांगितले होते, आळसावलेल्या डोळ्यांनी टीव्हीवर चमकण्याची त्यांची इच्छा नव्हती.
कार्ल जोनाथन स्लिम यांचा जन्म ब्रिटनमधील डर्बी येथे 9 फेब्रुवारी 1962 मध्ये झाला. त्यांनी डर्बी विद्यापीठातून प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर स्लिमने टोयोटाच्या प्रकल्पात अनेक वर्षे काम केले. त्यांचा कामाचा झपाटा एवढा होता की 1955 मध्ये जनरल मोटर्समध्ये नियुक्त होण्यापूर्वी ते टोयोटाच्या जनरल असेम्ब्लीच्या व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले होते.
जनरल मोटर्समध्ये त्यांनी तत्कालीन पूर्व जर्मनीतील थुरिगिया-एसिनाच येथील ओपेल प्रकल्पात लीन मॅन्युफॅक्चरिंग सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वॉटरबर्ग सॅलून कारसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता. तेथून स्लिम यांची बदली पोलंडमधील ग्लिविस येथील ओपेलच्या नव्या प्रकल्पात मॅन्युफॅक्चरिंग विभागाचे संचालकपदी करण्यात आली. त्यानंतर कॅनडातील ओंटारियो येथील ओशावा येथे 1999 मध्ये जीएन प्लांटचे व्यवस्थापकपद देण्यात आले.
स्लिम यांना 2007 मध्ये भारतातील जनरल मोटर्सचे महाव्यवस्थापक पद देण्यात आले. अमेरिकेतील या कंपनीसाठी भारतीय बाजारपेठ हे एक आव्हानच होते. स्लिम यांच्या कार्यकाळात कंपनीने मोठी प्रगती केली. त्यात स्पार्क, बीट आणि क्रूझ या कारच्या यशस्वितेचा मोठा वाटा राहिला. प्रत्येक प्रश्नाला स्लिम नेहमी हसतमुखाने उत्तर द्यायचे. एवढेच नव्हे तर ऑटो एक्स्पोसारख्या गर्दीच्या प्रदर्शनातही ते प्रत्येकाशी सौजन्याने वागायचे. टाटा मोटर्समध्ये रुजू होण्यापूर्वी कार्ल स्लिम जनरल मोटर्सच्या चीन येथील एसडीएमडब्ल्यू ऑटोमोबाइल या संयुक्त कंपनीत कार्यकारी उपाध्यक्ष होते. स्लिम हे एक उत्साही क्रीडापटू होते आणि डर्बीच्या स्थानिक फुटबॉल टीमकडून ते खेळायचे.
लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.