आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - वर्षभरात दामदुप्पट तसेच 12 ते 15 टक्के व्याजदराचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या इमू, आयएमसी, समृद्धी अशा कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल असताना आर्थिक गुन्हे शाखेने केबीसी मल्टिट्रेड कंपनी विरोधात जादा व्याजदराचे आमिष दाखवून निधी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयातून 4 कोटी 66 लाख रोख हस्तगत करत व्यवस्थापकास अटक करण्यात आली.
केबीसीत औरंगाबाद, परभणीसह मराठवाड्यातील अनेक शहरांतून गुंतवणूक झाली होती. मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसी कंपनीच्या भव्य कार्यालयावर शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी छापा टाकून कंपनीचे काही दस्तऐवज हस्तगत केले होते. शनिवारी सर्व दस्त आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कंपनीच्या व्यवस्थापकांनी केबीसी मल्टिट्रेड प्रा.लि. या कंपनीद्वारे सामान्य नागरिकांना सभासद करून घेत विविध प्रकारच्या योजनांमध्ये नोंदणी करण्यात आली. त्याद्वारे जास्तीत जास्त रक्कम गुंतविणा-या सभासदास सुलभ मार्गाने जास्तीत जास्त रक्कम मिळेल, असे आमिष दाखवण्यात आल्याचे उघडकीस आले. या सर्व कागदपत्रांची तपासणीअंती कंपनी कायदा 1956 नुसार द प्राईज चीट अॅण्ड मनी स्क्रुलेशन बीइंग अॅक्ट 1978, कलम 3, 4, 5 व 6) आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एस. एस. जाधव यांच्या फिर्यादीनुसार कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध आमिष दाखविल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यालयातून 4 कोटी 66 लाखांची रोकड आणि कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. व्यवस्थापक बापूसाहेब छबू चव्हाण यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका संशयास्पद
केबीसी कंपनीत बहुतांशी पोलिस अधिकारी-कर्मचा-यांनी गुंतवणूक केली असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करणा-या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना उत्तर दिले नाही. गुंतवणूकदारांपैकी कोणीच तक्रार दाखल केली नसून, गुंतवणूकदार पोलिसांनी कंपनीबाबत माहिती पुरवली असल्याने तपासी अधिकारी चांदखेडे यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चादेखील गुंतवणूकदार पोलिसांमध्ये होती.
फसव्या कंपन्यांची आठवण
केबीसी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आयएमसी, समृद्धी, कल्पवृक्ष आणि विकल्प या कंपन्यांची आठवण झाली. त्यांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. आता फसवणुकीची किती रक्कम समोर येते, याकडे लक्ष आहे.
काय होते पोलिसांचे आवाहन
अनेक जिल्ह्यांत केबीसी कंपनीच्या एजंटांमार्फत गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्यास सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. धुळे, जळगाव येथेही सापळा रचला.
काय आहे नाइट बिलियन ऑफ चेंबर?
व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, केबीसी (नाइट बिलियन ऑफ चेंबर) ही गरिबांना श्रीमंत करणारी योजना आहे. हॉटेल जत्राजवळ कार्यालय आहे. सर्व कामकाज ऑनलाइन चालते. हा 7200 रुपयांचा प्लॅन असून, साखळी पद्धतीने गुंतवणूकदार आणणा-यांना प्रत्येकामागे विशिष्ट पैसे दिले जातात. मल्टिलेव्हल मार्केटिंग (एमएलएम) असल्याने कंपनी कायद्यानुसार नोंदणी आहे. त्यास रिझर्व्ह बँक अथवा सेबीच्या परवानगीची गरज नाही. जसे सभासद वाढतील तसे कमिशन वाढत जाते. कंपनीकडून कुठल्याही प्रकारे दामदुप्पट अथवा तिपटीचे आमिष दाखवले जात नसल्याचा दावाही व्यवस्थापकाने पोलिसांनी गुंतवणूकदारांना सजगतचे आवाहन केल्यानंतर केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.