सांगली - किर्लोस्कर कंपनीने भारतातील पहिल्या संपूर्ण देशी बनावटीच्या वाफेवरील टर्बाइनची यशस्वी निर्मिती केली आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन व सहकार्याने हे टर्बाइन तयार करण्यात आल्याची माहिती किर्लोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी मंगळवारी दिली.
देशातील या पहिल्या टर्बाइनचे अनावरण मंगळवारी किर्लोस्करवाडीमध्ये करण्यात आले. या वेळी संजय किर्लोस्कर म्हणाले, ‘‘ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात हे टर्बाईन क्रांतिकारक ठरतील. वाफेवरील टर्बाइन हे पुढच्या पिढीचे तंत्रज्ञान आहे आणि संपूर्ण देशी बनावटीचे हे टर्बाइन तयार करण्याचा पहिला बहुमान आम्हाला मिळाला याचा अभिमान आहे. यापुढे देशाला वाफेवरील टर्बाइन्स आयात करावी लागणार नाहीत. व्यापारी वापरासाठी ही टर्बाइन्स तयार आहेत. भारतीय उद्योगांवर विदेशी बनावटींच्या तंत्राचा नेहमीच दबाव राहिला आहे. आता नव्या
सरकारच्या ‘मेक इन इंडिया’च्या धोरणाला आमचे हे टर्बाइन साद घालणारे आहेत. यापुढेही आमची कंपनी आणखी नवे संपूर्ण देशी बनावटीचे तंत्रज्ञान विकसित करायला इच्छुक आहे. त्यादृष्टीने आम्ही पावले टाकली आहेत.’’
टर्बाइनची वैशिट्ये
0 कार्यक्षमता वाढवते
0 वाऱ्यापासून होणारे नुकसान टाळते
0 कार्बनऐवजी मेकॅनिकल रिंग्जचा वापर
0 या सिंगल स्टेज टर्बाइनमध्ये स्टीम शील्ड्स, ब्लेड टीप सिल्सचा वापर