आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीच्या क्षेपणास्त्राने बाजार घायाळ; सेन्सेक्स 292 अंकांनी आपटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोरियाच्या आखातावर दाटलेले युद्धाचे ढग पाहून घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात विक्रीचा धडाका लावला. या विक्रीच्या मार्‍यात बाजारातील तेजीची चिता रचली आणि निर्देशांक आपटले. सेन्सेक्स 291.94 अंकांनी घसरुन 18509.70 या चार महिन्यातील नीचांकावर बंद झाला. निफ्टीने 5600 ची महत्त्वाची पातळी सोडत 98.15 अंकांच्या घसरणीसह 5,574.75 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात सकाळपासूनच युध्दाचे सावट होते. त्यातच चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकालाच्या चिंतेने निराश झालेल्या गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीवर जोर दिला. आयटीसी, इन्फोसिस आणि आयसीआयसीआयसह अनेक समभागांना याचा फटका बसला. सेन्सेक्समध्ये सलग दुसर्‍या सत्रात झालेल्या घसरगुंडीत गुंतवणूकदारांची श्रीमंती 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाली. गुरुवारी विक्रीचा मारा एवढा जोरदार होता की, त्यात शेअर बाजारातील सर्व 13 क्षेत्रीय निर्देशांकांत 0.42 ते 3.39 टक्के घसरण दिसून आली. रिअ‍ॅल्टी, आयटी, बँकींग, मेटल आणि पॉवर क्षेत्रातील समभागांना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. विदेशी गुंतवणूकदारही विक्रीत मागे नव्हते. रिलायन्स,आयटीसी कंपन्याना मोठा फटका बसल्याचे ब्रोकर्सनी सांगितले.

टॉप लुझर्स :
जिंदाल स्टील, टाटा स्टील, स्टरलाइट इंडस्ट्रीज, इन्फोसिस, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, भारती एअरटेल, हिंदाल्को, टीसीएस, भेल, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज

राजकीय घडामोडींचा बाजारावर परिणाम
देशातील राजकीय घडामोडी, मुदतपूर्व निवडणूक आणि कमोडिटी बाजारातील अस्थैर्य यामुळे शेअर बाजारात घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
अमर अंबानी, रिसर्च हेड, आयआयएफएल