मुंबई - देशातील अनेक टेलिकॉम कंपन्यांचा जुना परवाना लवकरच संपत आहे. मात्र, अशा कंपन्यांना अजूनही स्पेक्ट्रमचे वाटप झालेले नाही. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता विभागांत व्होडाफोन या आघाडीच्या
मोबाइल कंपनीचा परवाना हा नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे.
याप्रमाणेच एअरटेल कंपनीच्या दिल्ली आणि मुंबई विभागातील परवाना नोव्हेंबर महिन्यांत संपणार आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या लिलावात कंपन्यांनी जे स्पेक्ट्रम खरेदी केले होते त्याचे वाटप अद्यापही करण्यात आले नाही. सध्या कंपन्यांकडे या विभागात ९०० मेगाहर्टझ बँडचे स्पेक्ट्रम आहे. या कंपन्यांनी लिलावात ९०० आणि १८०० मेगाहर्टझ बँड स्पेक्ट्रम खरेदी केले होते. १८०० च्या तुलनेत ९०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम अधिक सक्षम मानले जाते. सध्याच्या घडीला सरकारने तत्काळ स्पेक्ट्रमचे वाटप केले तरी एवढ्या कालावधीत हा बदल करणे अशक्य आहे. यामुळेच व्होडाफोनने जुन्या स्पेक्ट्रम परवान्याचा कालावधी नवीन स्पेक्ट्रम मिळण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. दूरसंचार विभागानुसार (डॉट) नव्या फ्रिक्वेन्ससीमध्ये बदल करण्यासाठी कमीत कमी सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. व्होडाफोन समूहाचे प्रमुख व्हिटोरी कोलाओ आणि भारतातील कंपनीचे एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन पीटर्स यांनी काही दिवसांपूर्वी या मुद्द्यावर दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेऊन चर्चा केली होती.