आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीओने दिले 6000 कोटी, 2012-13 मध्ये 4 टक्क्यांनी वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये देशातल्या कंपन्यांनी प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून सहा हजार कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत निधी संकलनात 4 टक्क्यांनी वाढ झालेली असली तरी गेल्या आर्थिक वर्षात फारच कमी कंपन्यांनी भांडवल बाजारात आयपीओ आणण्याचे धाडस केले असल्याचे बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. या आर्थिक वर्षात भांडवल बाजारात प्रवेश केलेल्या बहुतांश कंपन्यांचे आयपीओ आकाराने लहान म्हणजे एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्याचे होते. त्यातही बर्‍याचशा कंपन्यांनी भांडवल बाजारातून मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे पाय काढणे पसंत केले. काही कंपन्यांनी आवश्यक ती मान्यता मिळवणे तसेच पुरेशी तयारी करण्यासाठी बाजारात आयपीओ आणले नाहीत.
भारती इन्फ्राटेलचा आयपीओ सर्वात मोठा : भारती एअरटेलच्या मोबाइल टॉवर व्यवसायात कार्यरत असलेल्या भारती इन्फ्राटेलने आणलेला आयपीओ हा गेल्या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ होता. या कंपनीने बाजारातून 4,118 कोटी रुपयांचा निधी उभारला. विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाने ऑक्टोबर 2010 मध्ये आणलेल्या आयपीओनंतरचा हा सर्वात मोठा आयपीओ आहे. या कंपनीने 15, 475 कोटी रुपये समभाग विक्रीतून उभारला होते.
‘आयपीओ’ला दागिन्यांची चमक : विशेष म्हणजे पीसी ज्वेलर्स, त्रिभुवनदास भीमजी झव्हेरी आणि तारा ज्वेल्स यंदाच्या आर्थिक वर्षात भांडवल बाजारात प्रवेश केला.
या वर्षाच्या प्रारंभी सेबीकडे ‘डीआरएचपी’ सादर करणार्‍या कंपन्या : ज्योती सीएनसी ऑटोमेशन, बीएससीपीएल इन्फ्रास्ट्रक्चर, ऑर्टेल कम्युनिकेशन्स
‘भारत बिझनेस चॅनल’ला मिळाली मंजुरी : व्हिडिओकॉन समूहातील डायरेक्ट टू होम क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारत बिझनेस चॅनल या कंपनीला 700 कोटी रुपयांचा आयपीओ आणण्यासाठी सेबीकडून याअगोदरच मान्यता मिळाली आहे.
कंपन्यांनी उभारलेली रक्कम अशी : पीसी ज्वेल्स : 609 कोटी रु. , केअर : 504 कोटी रु., रेपको होम फायनान्स : 270 कोटी रुपये, त्रिभुवनदास भीमजी झव्हेरी : 200 कोटी रु., तारा ज्वेल्स : 170 कोटी रुपये. व्हीकेएस प्रोजेक्ट्स : 55 कोटी रु. एमटी एज्युकेअर : 35 कोटी रु., स्पेशॅलिटी रेस्टॉरंट लि. : 26.41 कोटी रु.

तीन कंपन्यांचा बेत बारगळला
साई सिल्क, पॅकेजिंग क्षेत्रातील प्लास्टेन इंडिया लि., स्वर्धन मदरसन फायनान्स लि. या तीन कंपन्या समभाग बाजारातून एकूण 1,832 कोटी रुपयांचा निधी उभारणार होत्या. परंतु बाजारातील खराब वातावरणामुळे या कंपन्यांनी माघार घेतली. या बहुतांश कंपन्या समभाग विक्रीतून मिळणार्‍या निधीचा विनियोग विस्तार कार्य तसेच अन्य कंपनी गरजांसाठी करणार होत्या.

स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठेतील प्रतिकूल वातावरण, दुय्यम बाजारपेठेत इश्यू प्राइसपेक्षा खालच्या पातळीवर होणारे व्यवहार या सर्व गोष्टीमुळे बहुतांश कंपन्यांनी ‘आयपीओ’च्या माध्यमातून निधी उभारण्याचे टाळले. त्याचबरोबर केंद्रानेदेखील भागभांडवलाची विक्री केली.’’
अ‍ॅलेक्स मॅथ्यू, संशोधन प्रमुख, जिओजित बीएनपी परिबास फायनान्शियल सर्व्हिसेस