आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने बिघडवले सोयाबीनचे गणित, तीन महिन्यांपासून दर स्थिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पावसाने ओढ दिली असली तरी बाजारात सोयाबीनचे दर गेल्या तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे येत्या काळात पडणारा पाऊस आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी आवक या बाबी सोयाबीनचे पुढील गणित ठरवतील, असा अंदाज येथील व्यापारी वर्तवू लागले आहेत.
पावसाळ्याचे दोन महिने संपले असले तरी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. त्यामुळे काही पिके हातची गेली तर सोयाबीनसह अन्य पिके अल्प पावसावर कशीबशी जिवंत आहेत. परिणामी खरिपाच्या एकूण उत्पादनात 20 टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत. पण सोयाबीन बाजारावर त्याचा तूर्त तरी काहीच परिणाम होताना दिसत नाही.
जुलै महिना संपत आला तरी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन ते चार हजार क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. सोमवारी त्याचा भाव 4200 ते 4300 रुपयांदरम्यान होता.

जागतिक पीक : सोयाबीन हे महत्त्वाचे जागतिक पीक आहे. अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, चीन व भारत या देशांत त्याचे उत्पादन घेतले जाते. भारतात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात त्याची लागवड केली जाते. त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतात. परिणामी डॉलरची भूमिकाही महत्त्वाची असते.

भारत प्रमुख निर्यातदार
भारतात 9 ते 10 दशलक्ष टन सोयाबीनचे उत्पादन होते. त्याची निर्यात करण्यात भारत हा जगातील एक प्रमुख देश आहे. व्हिएतनाम, जपान, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, ग्रीस आदी राष्ट्रांत भारतातून सोयाबीन पाठवले जाते.

किरकोळ चढउतार
तीन महिन्यांपासून सायोबीनच्या दरात शे- दोनशेनी चढउतार झाली. सरासरी पाहता दर स्थिर आहेत. कलाटणी मिळेल, असा मोठा बदल होईल की नाही, हे तूर्त तरी सांगता येत नाही.
अशोक अगरवाल, आडत व्यापारी, लातूर