आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीचा आठवडा, विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बॅँकेचे पतधोरण, जीडीपीची जाहीर होणारी आकडेवारी या पुढील आठवड्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या सावध व्यवहारात सेन्सेक्स 17 अंकांनी गडगडत चार आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
गेल्या काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरू ठेवल्याने बाजारात नकारात्मक वातावरण आहे. तरीही शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल सुरू होती. परंतु तीन जूनला रिझर्व्ह बॅँकेचे पतधोरण जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली, पहिल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीकडे देखील बाजाराचे लक्ष आहे. या गोष्टीचा परिणाम बाजारावर झाला. गुंतवणूकदारांनी त्यामुळे बाजाराच्या व्यवहारापासून थोडे दूर राहण्याचे पसंत केल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीजच्या किरकोळ वितरण विभागाचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी सांगितले.
सौदापूर्ती सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चांगल्या पातळीवर उघडून तो 24,353.59 आणि 24,163.62अंकांच्या श्रेणीत फिरला. दिवस अखेर सेन्सेक्स 16.81 अंकांनी घसरून 24,217.34 अंकांच्या दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्समध्ये 119 अंकांनी वाढ झाली होती. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स 476.09 अंकांनी गडगडला.
महिनाभरात मात्र सेन्सक्सने 1,800 अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 5.70 अंकांनी घसरून 72229.25 अंकांच्या पातळीवर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 522.90 कोटी रुपयांच्या समभागांची गुरुवारी विक्री केली आहे. या गुंतवणूकदारांच्या विक्री धोरणामुळे सेन्सेक्सला विक्रमी पातळीवरून पायउतार व्हावे लागले.
जागतिक शेअर बाजारांमध्ये हाँगकाँग वगळता चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान हे आशियाई शेअर बाजार गडगडले. युरोप शेअर बाजारातही संमिश्र वातावरण होते. याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
नाणेनिधी धोरणात सुखद धक्का ?
रिझर्व्ह बँकेच्या सादर होणार्‍या नाणेनिधी धोरणात कोणताही बदल होणार नाही, असे म्हटले जात असले तरी पतधोरणात काही तरी सकारात्मक आश्चर्याचा धक्का मिळण्याची शक्यता कोटक सिक्युरिटीजचे तांत्रिक संशोधन प्रमुख श्रीकांत चौहान यांनी व्यक्त केली.
टॉप लुझर्स : स्टेट बँक, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, रिलायन्स.
टॉप गेनर्स : हिंदुस्तान युनिलिव्हर्स, एनटीपीसी, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा पॉवर, टाटा स्टील, भारती एअरटेल, गेल इंडिया, ओएनजीसी.
बँक समभागांची घसरगुंडी
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्याअगोदर सावध बाजाराने केलेल्या विक्रीच्या मार्‍यात बँक निर्देशांक 273.77 अंकांनी गडगडला. बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक, फेडरल बँक यांना फटका बसला.
रुपया घसरला
महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून डॉलरला मागणी वाढल्याचा फटका रुपयाला बसला. शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य आठ पैशांनी घसरून 59.11 वर आले. मागील सहापैकी पाच सत्रांत रुपयाला फटका बसला आहे.
संरक्षणविषयक समभाग चमकले
संरक्षण क्षेत्रात 100 टक्के एफडीआयचा प्रस्ताव वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे संरक्षणविषयक कंपन्यांच्या समभागांत 20 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. अस्ट्रा मायक्रोवेव्हचे समभाग 19.99 टक्क्यांनी वाढून 111.65 रुपयांवर बंद झाले. वालचंदनगर इंडस्ट्रीजचे समभाग 9.97 टक्के उसळीसह 100.90 रुपये झाले. बीईएमएलच्या समभागांत 6.98 टक्के वाढ होऊन शेअर 653.35 रुपये झाला. पिपावॉव्ह डिफेन्सच्या आणि ऑफशोअर इंजिनिअरिंगच्या समभागात समभागांत 4.97 टक्के वाढ दिसून आली. भारत इलेक्ट्रॉनिक्सचे समभाग 2.35 टक्क्यांनी वधारून 1611.45 रुपयांवर बंद झाले. संरक्षण क्षेत्रातील एफडीआय सध्याच्या 26 टक्क्यांवरून 100 टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.