आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर बाजाराने झटकली पाच दिवसांची मरगळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाजारात आलेल्या खरेदीच्या उत्साहात गेल्या पाच दिवसांपासूनच्या घसरणीला ब्रेक लागत सेन्सेक्सने 41 अंकांच्या वाढीची नोंद केली, परंतु नंतर बाजारातील चढ-उताराच्या वातावरणात सकाळच्या सत्रातील नफा काहीसा धुऊन निघाला
सकाळच्या सत्रात भक्कम पातळीवर उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये आणखी वाढ होऊन तो 22,592.03 अंकांच्या पातळीपर्यंत गेला, परंतु लोकसभा निवडणुकांचे निकाल जवळ आल्यामुळे सावध पवित्रा घेत गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री केली. परंतु तरीही दिवसअखेर सेन्सेक्स 41.23 अंकांनी वाढून 22,445.12 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या पाच सत्रांत सेन्सेक्सने 472.65 अंकांची आपटी खाल्ली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 4.55 अंकांनी वाढून 6699.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते. त्यात चीन आणि तैवान शेअर बाजारात चांगली वाढ झाली परंतु सिंगापूर आणि हॉँगकॉँग बाजार घसरले. युक्रेनच्या पेचप्रसंगामुळे युरोप शेअर बाजारात नरमाई होती. त्याचाही बाजारावर परिणाम झाला.
बाजारात सावध व्यवहार
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजाराने सावध पवित्रा घेतला आहे. त्यातून गेल्या आठवड्यात उत्पादन क्षेत्राची कामगिरी घटल्यामुळे नफारूपी विक्रीचा ताण वाढला आहे. बाजाराला चालना देण्यासाठी काही तिमाही निकालही अपयशी ठरल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केले.
टॉप गेनर्स : हिंदाल्को, ओएनजीसी, रिलायन्स, टाटा स्टील, एल अ‍ॅँड टी, अ‍ॅक्सिस बॅँक, आयटीसी
टॉप लुझर्स : एचडीएफसी, सिप्ला, टाटा पॉवर, भारती एअरटेल, इन्फोसिस, विप्रो.