मुंबई - तेल रिफायनरी, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, भांडवली वस्तू आणि बँकांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने मंगळवारी शेअर बाजारात तेजी आली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांतील 1.91 टक्क्याच्या वाढीने बाजारातील तेजीला आणखी बळ दिले. सेन्सेक्स 63.30 अंकांनी वाढून 22,508.42 या आठवड्याच्या उच्चांकावर स्थिरावला. निफ्टीने 15.95 अंकांच्या कमाईसह 6715.30 अंकांपर्यंत मजल मारली.
शेअर बाजारात सकाळपासूनच विक्री आणि खरेदीचा खेळ रंगला. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या समभागातही जोरदार खरेदी झाली. त्यातच विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी चांगली खरेदी केल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले. आशियातील प्रमुख शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. युरोपातील प्रमुख शेअर बाजारात प्रारंभीच्या सत्रात घसरणीचा कल होता. मुंबई शेअर बाजारातील 1383 समभाग घसरले, 1361 वधारले, तर 135 समभाग स्थिर राहिले. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रंगराजन यांनी महागाई कमी होऊन चांगला आर्थिक विकास होईल, असे मत व्यक्त केले. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला. दुपारच्या सत्रात विक्रीने जोर धरल्यानंंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक यांसारख्या दिग्गज समभागातील खरेदीने सेन्सेक्सला घसरणीपासून वाचवले व तेजी मिळवून दिली.
टॉप गेनर्स : रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन, आयटीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉ. रेड्डीज लॅब.
टॉप लुझर्स : भारती एअरटेल, टाटा पॉवर, विप्रो, एचडीएफसी, हीरो मोटोकॉर्प, अॅक्सिस बँक, बजाज ऑटो.
चालू खात्यातील तूट (कॅड) सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) 2 टक्के राहील, असा अंदाज डॉ. रंगराजन यांनी व्यक्त केल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. त्यामुळे सलग दुसर्या सत्रात सेन्सेक्सने तेजी नोंदवली.
जयंत मंगलिक, अध्यक्ष (रिटेल), रेलिगेअर सिक्युरिटीज
पुढील स्लाइडमध्ये, सोने चकाकले