आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे आहे. तुम्ही काहीही न करता ब्लूटूथ आणि जीपीएस प्रणालीच्या मदतीने जर तुमच्या पायातील पादत्राणानेच गंतव्य स्थानापर्यंत पोहोचवले तर? हो दोन भारतीय तंत्रज्ञानांच्या प्रयत्नातून बाजारात आलेल्या जगातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह स्पर्शचलित पादत्राणांमुळे हे शक्य झाले आहे.
क्रिस्पिअन लॉरेन्स आणि अनिरुद्ध शर्मा या एमआयटी आणि मिशिगन विद्यापीठाच्या तरुण उद्योजकांची दृष्टिहीनांना विना अडथळा प्रवास करता यावा यासाठी धडपड सुरू होती. या मूळ संकल्पनेतूनच या पादत्राणांची निर्मित झाली. यात होणार्या थरथराटाच्या (व्हायब्रेशन) मदतीने वापरकर्त्याला स्पर्शाच्या माध्यमातून इच्छित स्थळी नेणारी मार्गदर्शक अशी दिशादर्शक यंत्रणा बसवली.
शर्मा आणि लॉरेन्स यांच्या ड्युकेअर टेक्नॉलॉजीज या कंपनीचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर आता या तरुणांनी ‘मला घेऊन चल’ या वाक्याशी साधम्र्य ठेवून या ब्रँडलादेखील ‘ले चल’ असे कल्पक नाव दिले. मागील वर्षात एका जागतिक दर्जाच्या व्यापार परिषदेतही या ब्रँडला गौरवण्यात आले. हा अनोखा बूट सात मार्चला प्रत्यक्ष बाजारात येणार असून त्याच वेळी त्याची किंमत जाहीर करण्यात येणार आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर या बुटाची ऑनलाइन नोंदणी करता येईल, असे शर्मा यांनी सांगितले.
ले चल फुटवेअरच्या साह्याने तुमची पावलं मोजली जातात आणि तुम्ही किती उष्मांक जाळले, याचीही नोंद ठेवली जाते. त्यानुसार निर्णय घेता येतो तसेच आपल्या व्यायामाचेही नियोजन करू शकतो. वेगवेगळी स्थळे टॅग करू शकता, गंतव्य स्थाने सेट करू शकता आणि इतरही बरेच काही करू शकता. हे सर्व पायांच्या साध्या हालचालींनी करता येते.
दृष्टिहीनांना मिळणार दिशा : सर्वसामान्यांसाठी या पादत्राणांचे उत्पादन व विक्री करून मिळालेल्या पैशातून अंध व्यक्तींसाठी पादत्राणे कमी किमतीत उपलब्ध करून देणे ही भावना या उत्पादनाच्या मागे आहे. ले चल पादत्राणांचा खप जसा वाढेल तशी दृष्टिहीनांच्या पादत्राणांची किंमत कमी होईल. जेव्हा एक पादत्राणाची जोडी खरेदी केली जाईल त्या वेळी दृष्टिहीन व्यक्तींच्या पादत्राणांची जोडी कमी किमतीत उपलब्ध होईल. यासाठी हैदराबाद येथील एलव्ही आय इन्स्टिट्यूट ही संस्था मदत करणार असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्पिअन लॉरेन्स यांनी सांगितले.
बूट तुमच्यासाठी हे करतो
स्मार्टफोनवरील ब्लूटूथ पादत्राणाशी जोडले जाते वापरकर्ता त्या अँपच्या साह्याने गंतव्य स्थान निश्चित करतो. त्यानंतर जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून त्या स्थानाची माहिती गोळा करून स्पर्शसंवेदनांच्या साह्याने (साधी थरथर) वापरकर्त्याला दिशा दाखवली जाते. जे पादत्राण थरथरेल, त्या मार्गाने, त्याच्या दिशेने जायचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.