आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी फायद्याच्या विमा पॉलिसी बंद करणे उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकांकडे अशा विमा पॉलिसी असतात ज्या पुरेसे विमा संरक्षणही देत नाहीत आणि म्हणावा तसा परतावाही देत नाहीत. अशा स्थितीत नेमके काय करावे त्याबद्दल माहिती घेऊया...
कमी लाभाच्या पॉलिसी बंद करा : सध्या तुमच्याकडे असलेल्या विमा पॉलिसींचे समीक्षण करा. त्यात कमी विमा संरक्षण असणा-या, परंतु जास्त प्रीमियम द्याव्या लागणा-या पॉलिसी निवडा. त्यानंतर लिक्विडिटी, पार्शियल विड्रॉल आणि सुलभता या मुद्द्यांचा विचार करा. त्यानंतर या पॉलिसींची यादी तयार करा. त्यातून बंद करण्याच्या पॉलिसींवर शिक्कामोर्तब करा.
पॉलिसी बंद करणे योग्य आहे का? : कोणत्याही प्रकारची पॉलिसी बंद करणे किंवा तिचा प्रीमियम भरणे बंद करणे हे कोणालाही प्रथमदर्शनी योग्य वाटत नाही. अनेकांसाठी हा भावनिक निर्णय असू शकतो. मात्र, लक्षात घ्या की, असे केल्याने त्यातून नव्या संधीही मिळू शकतात. तुमच्या हाती रोख पैसाही येतो, जो तुम्ही कमी
फायद्याच्या पॉलिसींत गुंतवला होता. आपली आर्थिक उद्दिष्टे मार्गी लावण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. उर्वरित काळासाठी ही रक्कम इतर वित्तीय साधनांत गुंतवता येते.
विविध पर्याय
1) प्रीमियम भरणे सुरूच ठेवले तर काय होईल : समजा अशा पॉलिसींसाठी तुम्ही उर्वरित वर्षांसाठी मोठ्या रकमेचे प्रीमियम भराल आणि शेवटी कमी विमा संरक्षण असल्यामुळे किरकोळ रक्कम हाती येईल. शॉर्ट टर्मसाठी अशा प्रकारची पॉलिसी सुरू ठेवण्यास हरकत नाही. अशा पॉलिसीसाठी विमा संरक्षण पाच ते 20 लाख रुपये असू शकते. मात्र, सध्याचे धावपळीचे आणि वेगवान जीवनमान लक्षात घेता ही रक्कम चार ते पाच वर्षे पुरेल इतकीच आहे. अशा स्थितीत अशा पॉलिसी आपल्या आयुर्विम्याच्या गरजपूर्तीसाठी अपु-या ठरतात. तुम्ही परताव्याच्या दृष्टीने विचार केला तर 10, 15 किंवा 20 वर्षांनंतर या पॉलिसीपासून मिळणा-या रकमेचे मूल्य वास्तविक किती असेल? भविष्यात तुमच्या खर्चातही वाढ झालेली असते हे लक्षात घ्या. भांडवली वृद्धीच्या दृष्टीनेही अशा पॉलिसी आपली उद्दिष्टपूर्ती करू शकत नाहीत.
2) पॉलिसी बंद करावी की सरेंडर करावी : हा पर्याय निवडताना तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्रथम आपले निवृत्तीचे वय लक्षात घेऊन 20 ते 23 वर्षांसाठी ऑनलाइन टर्म विम्याद्वारे योग्य विमा संरक्षण घ्यावे. कमी फायद्याच्या पॉलिसी बंद किंवा सरेंडर केल्यानंतर मिळणारी रक्कम पीपीएफ, फिक्स्ड डिपॉझिट किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवता येते. पीपीएफ आणि इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 क द्वारे कर बचत साधता येते. यातील मॅच्युरिटी रक्कमही विमा पॉलिसींप्रमाणे करमुक्त असते.
निष्कर्ष : पॉलिसी घेतल्यानंतर एक ते तीन वर्षांत काही प्रमाणात प्रीमियम भरला असेल तर कमी विमा संरक्षणासह महागड्या प्रीमियमच्या पॉलिसी बंद करू शकता. जर एखाद्या पॉलिसीसाठी चार ते सात वर्षे प्रीमियम भरला असेल तर अशा पॉलिसी पेडअप करून पुढील प्रीमियम भरणे बंद करता येते. समजा पॉलिसी मॅच्युरिटीच्या नजीक असेल तर ती सुरू ठेवावी.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.