आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएसआय, पीएफची वेतन मर्यादा वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्मचा-यांना मिळणा-या राज्य कामगार विमा सुविधा (ईएसआय) आणि भविष्य निर्वाह निधीसाठी (पीएफ) सध्याची वेतन मर्यादा वाढवण्याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री के. सुरेश यांनी तसे संकेत दिले आहेत.

के. सुरेश यांनी सांगितले, कर्मचा-यांना मिळणा-या ईएसआय आणि पीएफच्या सध्याच्या वेतन मर्यादेत वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे. या मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी सर्वच कर्मचारी संघटनांनी केली आहे. हे लक्षात घेता पीएफसाठी सध्या असणारी 6,500 रुपयांची वेतन मर्यादा 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे, तर ईएसआय कायद्याअंतर्गत कर्मचा-यांना मिळणा-या संरक्षणासाठी सध्या 15,000 रुपये वेतन मर्यादा आहे. ही मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

के. सुरेश यांनी या वेळी त्यांच्या मंत्रालयाकडून राबवण्यात येणा-या विविध योजनांचे परीक्षण केले. ते म्हणाले, कर्मचा-यांच्या विविध संघटना, ट्रेड युनियन यांच्याकडून सातत्याने ईएसआय आणि पीएफची मर्यादा वाढवण्याची मागणी होत आहे. ती लक्षात घेऊन तशा आशयाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. तसेच श्रम मंत्रालय आणखी एका महत्त्वाच्या विषयावर प्रस्ताव तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, असंघटित क्षेत्रात कार्यरत असणा-या कर्मचा-यांसाठी हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वाचा आहे. असंघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी किमान वेतन 10,000 रुपये निश्चित करण्याबाबत विचार होत आहे. या प्रस्तावांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

सरकारचा विचार
० पीएफसाठी सध्या 6,500 रुपये वेतन मर्यादा आहे. ती 15,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे.
० ईएसआय कायद्यान्वये सध्या 15,000 रुपये वेतन मर्यादा आहे. ही मर्यादा 25,000 रुपये करण्याचा सरकारचा विचार.
० असंघटित क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी किमान वेतन 10,000 रुपये करण्याचा प्रस्ताव..