आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीपासून कर्ज स्वस्ताईला सुरुवात, बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विकासाचे चक्र गतिमान करण्यासाठी नवीन वर्षात व्याजदर कमी होण्याची शक्यता असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फेब्रुवारी महिन्यात जाहीर करणार असलेल्या आपल्या नाणेनिधी धोरण आढाव्यामध्ये व्याजदरात पाव टक्क्याने कपात करण्याची शक्यता बँक आॅफ अमेरिका मेरिल लिंचने एका अहवालात व्यक्त केली आहे.
यंदाच्या मार्चमध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६२ रुपयांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे किरकोळ महागाई जानेवारीपर्यंत आठ टक्के आणि पुढील वर्षाच्या जानेवारीत ती ६ टक्क्यांपर्यंत आणण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य साध्य होण्याची शक्यता जागतिक पातळीवरील या आघाडीच्या वित्त सेवा कंपनीने व्यक्त केली आहे. नवीन वर्ष आनंदाचे जाणार असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन तीन फेब्रुवारीला व्याजदरात पाव टक्क्याने कपात करतील, असा अंदाज बीओएफए - एमएलने आपल्या संशोधन अहवालात व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षातील पहिली व्याजदर कपात फेब्रुवारी महिन्यात होऊन एकूण पाऊण टक्के व्याजदर कपात होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या विविध कारणांमुळे महागाई नियंत्रणास मदत होईल.

महागाईवर नजर
किरकोळ महागाईच्या सकारात्मक बेस इफेक्टचा कालावधी आता संपला असून किरकोळ महागाई नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून पुढील तीन महिन्यांत ती साडेपाच ते सहा टक्क्यांवर जाण्याची शक्यता नोमुरा या जागतिक वित्तीय सेवा कंपनीच्या भारतातील अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा यांनी व्यक्त केले. किरकोळ महागाई जानेवारी २०१६ पर्यंत सहा टक्क्यांवर जाण्याचे लक्ष्य रिझर्व्ह बँकेने ठेवले आहे, परंतु ते त्या अगोदरच होण्याची शक्यता असल्याने एप्रिल आणि जून या दोन्ही महिन्यांमध्ये व्याजदरात पाव टक्क्याची कपात होण्याची शक्यता नोमुराने व्यक्त केली आहे.