मुंबई - यंदाच्या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास पुढील वर्षाच्या जानेवारीपर्यंत महागाई निर्धारित आठ टक्क्यांवर रोखून ठेवणे जिकिरीचे ठरणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तरी रिझर्व्ह बँक व्याजदराला कात्री लावण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदरात कपात केली नाही तर स्वस्त कर्ज मिळण्याचे स्वप्न अपु-या पावसात वाहून जाण्याची शक्यता आहे.असे असले तरी विकासदराचा वेग मात्र साडेपाच टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस तसेच अन्नधान्य तसेच बिगर अन्नधान्याची कायम असलेली महागाई लक्षात घेता पुढील जानेवारीपर्यंत महागाई आठ टक्क्यांच्या खाली नियंत्रणात आणणे रिझर्व्ह बँकेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे व्याजदर वाढीला विराम तसेच नाणेनिधी धोरण सुसह्य होणे पुढील वर्षापर्यंत तरी लांबणीवर पडणार असल्याचे या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
दुसरी सहामाही महत्त्वाची
उत्पादन क्षेत्राच्या वाढीमध्ये अल्पशी, आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाहीत गुंतवणुकीचा वाढणारा वेग या गोष्टी विचारात घेता आर्थिक विकासदर पाच ते साडेपाच टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज इक्राने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. सरकारी आकडेवारीमध्ये विकासदर आर्थिक वर्ष 2014 मध्ये अगोदरच्या साडेचार टक्क्यांवरून 4.9 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अधिकृत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महागाईचे वांधे
हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे जानेवारी 2015 पर्यंत महागाई आठ टक्क्यांच्या आत नियंत्रित करण्याचे लक्ष्य रिझर्व्ह बँक साध्य करू शकणार नाही. चढ्या व्याजदरामुळे आर्थिक पुनरुज्जीवनावर परिणाम होत असून ग्राहकांची मागणीदेखील त्या प्रमाणात वाढत नसल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते महागाई पाच टक्क्यांच्या खाली राहणे ही व्याजदर कपातीसाठी समाधानकारक पातळी मानली जाते. मात्र महागाई पाच टक्क्यांच्या वर राहिल्यास स्वस्त कर्जाचे स्वप्न लांबणार आहे.