आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडीत कर्जाचे प्रमाण वाढणार; ‘फीच’ने व्यक्त केली भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येत्या दोन वर्षांत देशातल्या बॅँकिंग यंत्रणेतील बुडीत कर्जांचे प्रमाण लक्षणीय वाढण्याचा अंदाज ‘फीच’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने व्यक्त केला. मात्र, हे प्रमाण नेमके किती वाढणार याची आकडेवारी दिलेली नाही.

चालू आर्थिक वर्षाच्या मध्यापर्यंत बॅँकिंग यंत्रणेतील अनुत्पादित कर्जांचे प्रमाण कमाल पातळीवर जाईल, असा अंदाज ‘फीच’ने याअगोदर व्यक्त केला होता. परंतु अलीकडे झालेल्या आर्थिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता फीचने पुन्हा आपल्या अंदाजात बदल केला आहे.

फीचच्या वित्तीय संस्था विभागाचे संचालक सास्वता गुहा म्हणाले की, उशिरात उशिरा मार्च 2016 पर्यंत देशातल्या बॅँकांच्या अनुत्पादित कर्जांचे प्रमाण कमाल पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

अगोदरच्याच आठवड्यात या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅँक आणि बॅँक ऑफ इंडिया या दोन्ही बॅँकांचे पतमानांकन ‘बीबी +’ वरून ‘बीबीबी -’ असे घटवले. लांबलेली आर्थिक मंदी, मालमत्तेवर आलेला अति ताण आणि या बॅँकांच्या भांडवलाचे कमी प्रमाण लक्षात घेऊन हे मानांकन कमी करण्यात आले आहे. परंतु या बॅँकांचे दीर्घकालीन ‘बीबीबी -’ मानांकन मात्र कायम ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, याअगोदरच्याच आठवड्यात ‘मुडीज’ या आणखी एका जागतिक पातळीवरील पतमानांकन संस्थेने स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे असुरक्षित कर्ज आणि स्थानिक चलन ठेवींचे मानांकन ‘बीबीए 2’ वरून ‘बीएए 3’ असे घटवले होते. मत्ता दर्जा आणि पुनर्भांडवलीकरणाबाबतदेखील मुडीजने चिंता व्यक्त केली होती.