आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Look Over Completed For International Airport At Rajguru Nagar

राजगुरू नगर विमानतळासाठी जागेची पाहणी पूर्ण, लोहगावच्‍या सुविधेतही होणार वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ जागेची पाहणी पूर्ण झाली आहे. तसेच सध्याच्या लोहगाव तळावरील पायाभूत सुविधा आणखी वाढविल्या जाणार असल्‍याची माहिती मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्‍ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष एस के जैन आणि एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी दिली.

अधिक माहिती देताना भूषण गोखले म्हणाले की, प्रस्तावित जागेची हवाई आणि जमिनीलगत पाहणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महिन्यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमान वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला आहे. पिकाखाली असलेली कमीत कमी जमीन घेतली जावी आणि जमीन संपादनात अडथळा येऊ नये असा आमचा हेतू आहे. पुण्याकडे येणारी आणि येथून बाहेर जाणारी हवाई वाहतूक वेगाने वाढते आहे. सध्याचा विमानतळ अपुरा पडतो आहे. त्यामुळे पूर्वेकडील देशांशी असलेली सेवा वाढावी, सध्याच्या तळाची क्षमता वाढवावी यावर आम्ही भर देत आहोत. प्रवाशांची संख्या २००५ मध्ये एक लाख होती ती आता प्रतिवर्ष ३५ लाख झाली आहे. यावरून सध्याच्या सुविधेत वाढ आणि नवीन विमानतळ किती गरजेचे आहे हे लक्षात येते. वर्षाला ३० टक्के दराने प्रवासी वाढत असून देशात इतरत्र ते कमी होत असताना मात्र वाढ होते आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमान वाहतूक मंत्रालयाशी सातत्याने सल्लामसलत सुरु असून महाराष्ट्र सरकारलाही अंतिम शिफारशी सादर केल्या आहेत. नवीन विमानतळ झाल्यास केवळ पुणे नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांनाही त्याचा फायदा होईल आणि आर्थिक तसेच औद्योगिक विकासाला हातभार लागेल असे जैन यांनी नमूद केले.

चेंबरचे महासंचालक अनंत सरदेशमुख म्हणाले की याबाबत संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे. त्यामुळे हवाई दलाच्या तळावर असलेला ताण कमी होणार आहे हवाई दलाकडून नव्या जागेला ना हरकत प्रमाणपत्र मिळेल अशी अपेक्षा आहे सध्याच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेत होणार असून त्यामुळे फ्रँकफर्टकडे जाणा-या सेवेचे वेळापत्रक बदलणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले