आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lord Ganesh Be Happy.. Industrial Growth Wheel Speed, Inflation Come Down

बाप्पा पावले.. औद्योगिक चक्राला गती, महागाईत घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या सलग दोन महिन्यांपासून मंदावलेल्या औद्योगिक उत्पादनाचे चक्र पुन्हा एकदा गतिमान झाले आहे. उत्पादन आणि ऊर्जा क्षेत्राने केलेल्या लक्षणीय कामगिरीमुळे जुलै महिन्यात औद्योगिक उत्पादनाने 2.6 टक्के अशी सकारात्मक वाढीची नोंद केली आहे.


औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर आधारात औद्योगिक उत्पादन गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात 0.1 टक्क्यांनी घटले होते, असे केंद्रीय सांख्यिकी संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये नमूद केले आहे. मे महिन्यात औद्योगिक उत्पादन जवळपास 2.8 टक्क्यांनी घटले होते. यंदाच्या एप्रिल ते जुलै या कालावधीत औद्योगिक उत्पादन घसरण 0.2 टक्के अशी नोंद झाली होती.


औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 75 टक्के वाटा असलेल्या उत्पादन क्षेत्राने जुलै महिन्यात 3 टक्के वाढीची नोंद केली आहे. त्या अगोदरच्या वर्षात याच कालावधीत शून्य वाढीची नोंद या क्षेत्राने केली होती. एप्रिल ते जुलै या कालावधीत अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 0.6 टक्के घसरणीच्या तुलनेत यंदा ही घट कमी म्हणजे 0.2 टक्के झाली आहे.


ऊर्जा निर्मिती क्षेत्राने चमकदार कामगिरी करताना जुलै महिन्यात 5.2 टक्के वाढीची नोंद केली आहे. अगोदरच्या वर्षात याच क्षेत्राने 2.8 टक्के वाढ नोंदवली होती. दरम्यान एप्रिल ते जुलै या कालावधीत या क्षेत्राने 3.9 टक्के वाढ नोंदवली आहे. त्या अगोदरच्या वर्षात याच कालावधीत ऊर्जा क्षेत्राने लक्षणीय 5.5 टक्के वाढ साध्य केली होती.
मागणीमध्ये चांगली वाढ झाल्यामुळे भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्राने जुलै महिन्यात अगोदरच्या वर्षातल्या 5.8 टक्क्यांच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये लक्षणीय 15.6 टक्के वाढ झाली आहे. परंतु गेल्या वर्षातल्या एप्रिल ते जुलै महिन्यातील 16.8 टक्क्यांच्या लक्षणीय घसरणीच्या तुलनेत यंदा मात्र किरकोळ 1.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. काही प्रमुख क्षेत्रांनी मात्र घसरणीचा सूर कायम ठेवला आहे. यामध्ये खाणकाम क्षेत्रात अगोदरच्या वर्षातल्या जुलै महिन्यातील 3.5 टक्के घसरणीच्या तुलनेत कमी म्हणजे 2.3 टक्के घट नोंदवली आहे.


किरकोळ महागाईत घट
नवी दिल्ली । भाजीपाला वगळता बहुतेक वस्तूंचे भाव कमी झाल्याने ऑगस्टमधील किरकोळ महागाईत घट झाली. ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) नावाने ओळखण्यात येणारा किरकोळ महागाईचा दर ऑगस्टमध्ये 9.52 टक्क्यांवर आला. जुलैमध्ये हा दर 9.64 टक्के होता. मार्चपासून हा महागाई दर नरमाई दाखवत आहे. मात्र जूनमध्ये भाजीपाला कडाडल्याने किरकोळ महागाईने घाऊक वाढ नोंदवली होती. ऑगस्टमध्येही भाजीपाला महागाईचा दर कडाडलेला असून 26.48 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जुलैमध्ये भाजीपाला महागाई दर 16.4 टक्के होता. दूध आणि दुग्धजन्य उत्पादने, कपडे आणि पादत्राणे क्षेत्रात मात्र घसरण दिसून आली.