आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Low Price Air Travelling Dream Now Ends, Airlilnes Bankruptancy

स्वस्त विमान प्रवासाचे युग संपणार, लो बजेट विमान वाहतूक कंपन्यांचे कर्जामुळे दिवाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्ज आणि तोट्यात बुडालेल्या देशातील चौथ्या क्रमांकाच्या स्पाइस जेट या खासगी विमान वाहतूक कंपनीला आता घरघर लागली आहे. त्यामुळे देशातील स्वस्त दरात विमानप्रवास करण्याचे युग समाप्तीच्या धावपट्टीवर आले आहे. बुधवारी स्पाइस जेटच्या विमानांना तेल कंपन्यांनी इंधन देण्यास नकार दिल्यानंतर १० तास कंपनीची विमाने धावपट्टीवरच उभी होती. तेल कंपन्यांना ३ कोटी रुपये दिल्यानंतर स्पाइस जेटच्या विमानांना आकाशात भरारी घेता आली.

इंधन पुरवठा का तोडला?
स्पाइस जेटने सहा महिन्यांपूर्वी तेल कंपन्यांशी कॅश अँड कॅरीचा करार केला होता. विमान वाहतूक कंपनी जितके पैसे देईल तेवढे इंधन मिळेल, असा याचा अर्थ. उधारीवर तेल मिळणार नाही.

संकट अद्याप टळलेले नाही
स्पाइस जेट जेव्हा रोख पैसे देईल तेव्हाच तेलाचा पुरवठा करू, अशी भूमिका तेल कंपन्यांनी घेतली. कंपनीकडील रोख रकमेची चणचण पाहता अशी स्थिती पुन्हा येऊ शकते.

का आली वेळ?
स्पाइस जेटच्या डोक्यावर सुमारे २००० कोटींचे देणे आहे. यात विमानतळ प्राधिकरण व तेल कंपन्यांकडील थकबाकीचाही समावेश आहे. या बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी विविध विमान कंपन्यांत स्पर्धा आहे. यातूनच स्पाइसने स्वस्त तिकिटांची ऑफर दिली. खर्चापेक्षा कमी पैशांत उड्डाणे केल्याने कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली.

स्पाइस जेट
२४३ उड्डाणे सध्या दररोज
४८ शहरांतून होतात उड्डाणे
१४,५०० कोटी रु. प्रवर्तक कलानिधी मारन यांची संपत्ती

अशीच बंद पडली किंगफिशर
किंगफिशरवर बँकांचे ७००० कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. दोन वर्षांपासून याची उड्डाणे बंद आहेत. काही बँकांनी किंगफिशर, प्रवर्तक विजय मल्ल्या आणि काही अधिका-यांना विलफुल डिफॉल्टर घोषित केले आहे, तर काही बँका त्या प्रक्रियेत आहेत.

सन ग्रुपची माघार
स्पाइसची मातृसंस्था असणा-या सन समूहाने विमान वाहतुकीत जास्त पैसे लावणार नाही, असे सांगितले. सीएफओ एस. एल. नारायणन यांच्या मते समूह बँक कर्जाची गॅरंटी देऊ शकतो, यापेक्षा जास्त नाही. समूहाकडे रोखतेची चणचण आहे. कलानिधी मारन सन ग्रुपचे प्रवर्तक आहेत.

भाडे महाग होण्यास सुरुवात
स्वस्त दरातील विमान प्रवासाची सुरुवात एअर डेक्कन आणि किंगफिशर यांनी केली. मात्र, हे बिझनेस मॉडेल अयशस्वी ठरले. सर्वप्रथम एअर डेक्कन बंद पडली. त्यानंतर २०१२ मध्ये किंगफिशरही बंद पडली. विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व केपीएमजीचे पार्टनर अंबर दुबे यांच्या मते, स्वस्त विमान तिकिटांच्या योजनेमागे लो बजेट विमान कंपन्यांचा मोठा हात आहे. नववर्षाच्या सुट्यांपूर्वी स्पाइस जेटचा प्रकार घडल्याने प्रवाशांत उलटसुलट प्रतिक्रिया आहेत. स्पाइस जेटच्या प्रकारामुळे इतर विमान वाहतूक कंपन्यांनी तिकीट दर वाढवण्यास सुरुवात केली आहे.
सर्वसाधारण परिस्थितीत दिल्लीहून मुंबईसाठी इकॉनॉमी श्रेणीचे भाडे ६ ते ८ हजार रुपये आहे. स्पाइस जेटची उड्डाणे रद्द झाल्याने हे भाडे ११ ते १५ हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. दिल्ली ते अहमदाबादसाठीचे ५ ते ७ हजार रुपयांचे भाडे आता ६ ते ११ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दिल्ली ते कोलकाताचे ६ ते ८ रुपयांचे भाडे आता १० ते २३ हजारांवर पोहोचले आहे.